20.7 C
Latur
Sunday, December 8, 2024
Homeलातूर६,७३,५०२ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली

६,७३,५०२ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली

लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील लातूर शहर, लातूर ग्रामीण, औसा, निलंगा, उदगीर व अहमदपूर या सहा विधानसभा मतदारसंघात एकुण २० लाख ४२ हजार ७४७ मतदार आहेत. यापैकी १३ लाख ६९ हजार २४५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यातील ६ लाख ७३ हजार ५०२ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का ४.७ ने वाढला असला तरी पावणे  सात लाख मतदारांनी मतदानाच केले नाही. त्याची कारणे अनेक विविध असू शकतील परंतु, याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात झाले. या मतदारसंघात ६९.९२ टक्के मतदान झाले. लातूर शहर विधानसभा मतदारसंघात ६२.७४ टक्के, अहमदपूर विधानसभा मतदारसंधात ६८.७१ टक्के, उदगीर (अ. जा.) विधानसभा मतदारसंघात ६७.११ टक्के, निलंगा विधानसभा मतदारसंघात ६५.७५ टक्के आणि औसा विधानसभा मतदारसंघात ६८.८८ टक्के मतदान झाले. एकुण सहा विधानसभा मतदारसंघात ४.७ टक्के मतदानाचा टक्का वाढला. वाढलेले मतदान नवमतदारांचे की, उत्स्फुर्त वाढले, याचे स्पष्टीकरण आज होणा-या मतमोजणीनंरत होईल. निवडणुक आयोग आणि सेवाभावी संस्थांनी केलेल्या जनजागृतीमुळे मतांचा टक्का वाढलेला दिसून येतो. परंतु, ६ लाख ७३ हजार ५०२ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवणे, याची कारणे शोधावी लागणार आहेत.
जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात १० लाख ६५ हजार ९१५ पुरुष, ९ लाख ७६ हजार ७५७ महिला मतदार आहेत. त्यापैकी ७ लाख १८ हजार ४२१ पुरुष आणि ६ लाख ५० हजार ७८७ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील ४ लाख ३४ हजार मतदारांपैकी २ लाख ५० हजार ९२५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात १ लाख २९ हजार ९८४ पुरुष तर १ लाख २० हजार ९७४ महिला मतदारांचा समावेश आहे. तसेच इतर १७ जणांनी मतदानाचा हक्क बजावला.
या मतदारसंघात २०१९ च्या तूलनेत ६.२२ टक्के मतदान वाढले आहे. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात १लाख २४ हजार ७४९ पुरुष तर १ लाख ९ हजार २०० महिलांनी मतदान केले. २०१९ च्या निवडणुकीत या मतदारसंघात ६१.८२ टक्के मतदान झाले होते. यंदा ६९.९२ टक्के मतदान झाले. या मतदारसंघात यावेळी ८ टक्क्यांनी वाढ झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR