ाातूर : प्रतिनिधी
येथील एमआयएमएसआर (एमआयटी) वैद्यकीय महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात २६ आठवड्यांत (साडे सहा महिन्यात) जन्मलेल्या आणि केवळ ७४० ग्रॅम वजनाच्या बालिकेला जवळपास चार महिन्यांच्या उपचारानंतर २.१ किलो वजनाने यशस्वीरीत्या डिस्चार्ज देण्यात आला. अनेक गुंतागुंतींवर मात करून बालिका आता ऑक्सिजनशिवाय श्वास घेत असून, तिची वाढ समाधानकारक आहे.
वैद्यकीय गुंतागुंतीमुळे पूर्ण दिवस झालेले नसतानाही, एक महिला अवघ्या २६ आठवड्यांत प्रसूतीसाठी एमआयटीच्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली. तेथे डॉक्टरांनी तिच्यावर योग्य ते उपचार करून प्रसूती केली, ज्यामध्ये तिने केवळ ७४० ग्रॅम वजनाच्या बाळाला जन्म दिला. नवजात बळावर रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरच्या पथकांनी नवजात शिशु अतिदक्षता विभागात तब्बल चार महिने उपचार केले असता २ किलो १०० ग्रॅम बाळाचे वजन भरल्यानंतर कृत्रिम ऑक्सिजन शिवाय श्वास घेत असल्याने त्यास रुग्णालयातून यशस्वीरित्या सुट्टी देण्यात आली.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पालकांवर अत्यल्प आर्थिक भार ठेवून उपचार करण्यात आले. रुग्णालयातील बालरोग विभागप्रमुख डॉ. विद्यादेवी कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवजात शिशुरोगतज्ज्ञ डॉ. दीपीका माशाळकर भोसले यांनी या बालिकेच्या उपचारांचे नेतृत्व केले. श्वसनासाठी आवश्यक मदत, गंभीर गुंतागुंतींचे व्यवस्थापन आणि उपचारांचे काटेकोर नियोजनात त्यांचे मोलाचे योगदान लाभले. डॉ. शितल भट्टड, डॉ. विशाखा पाडिले, डॉ. नैना गोडबोले, निवासी डॉक्टर, परिचारिका आणि संपूर्ण ठकउव टीमच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे यश मिळाले.
अत्यंत योग्य वेळी डॉ. सुवर्णा बिराजदार यांनी प्रसूतीपूर्व स्थलांतराचा योग्य तो निर्णय घेतला. अकाली प्रसूतीची शक्यता असल्यास गर्भवती महिलेला शक्य असेल तेव्हा प्रसूतीपूर्वीच नवजात बालकांसाठी अतिदक्षता सुविधा असलेल्या सुसज्ज रुग्णालयात पाठवावे जेणेकरून बाळाचे प्राण वाचवता येतील हे यातून सिद्ध झाले आहे. या यशाबद्दल एमआयटीचे कार्यकारी संचालक आमदार रमेश कराड, कॅम्पस समन्वयक पृथ्वीराज कराड, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. नवाब जमादार, उपअधिष्ठाता डॉ. बी. एस. नागोबा, रुग्णालय अधीक्षक डॉ. बी. बी. जाधव, शैक्षणिक आणि प्रशासकीय प्रमुख डॉ. सरिता मंत्री, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. पाटील यांनी स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाने वेळेवर केलेल्या शस्त्रक्रियेबद्दल आणि योग्य प्रसूती व्यवस्थापनाबद्दल अभिनंदन केले आहे.
















