लातूर : प्रतिनिधी
महिला व मुलींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना शासनाने सुरू केल्यानंतर लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे. लातूर जिल्हा परिषदेकडे रोजगारासाठी अर्ज केलेल्या बेरोजगार युवकांच्या कागदपत्रांची पडताळणी करून पात्र झालेल्या ७८ बेरोजगार तरूणांची ६ महिण्यासाठी जिल्हा परिषदेने निवड केली असून निवडीचे पत्रही देण्यात आले आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत लातूर जिल्हा परिषदेमध्ये विविध विभागाच्या संवर्गातील एकूण ९४९६ मंजूर पदे आहेत. त्यापैकी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी एकूण मंजूर पदाच्या ५ टक्के प्रमाणे येणारी संख्या ४७४ व जिल्ह्यात ७८६ ग्राम पंचायतीसाठी प्रत्येकी १ उमेदवार असे १२६० प्रशिक्षणार्थी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
उमेदवारांकडून दि. ८ ऑगस्ट रोजी ८७४ उमेदवारांनी ‘महास्वयं’ संकेतस्थळावर ऑनलाईनव्दारे नोंदणी केलेली आहे. त्यापैकी नोंदणी केलेल्या उमेदवारांची दि. ७ व ८ ऑगस्ट रोजी लातूर जिल्हा परिषद कार्यालयात कागदपत्रांची पडताळणी करुन पडताळणीनंतर शैक्षणीक अर्हतेनुसार प्रत्यक्ष ७८ प्रशिक्षणार्थी उमेदवारांना पुढील सहा महिन्यांकरिता नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत. तसेच ‘महास्वयं’ संकेतस्थळावर ऑनलाईनव्दारे उर्वरित उमेदवारांचे कागदपत्रांची पडताळणीचे काम सुरु ठेवण्यात आले असून कागदपत्रांच्या पडताळणीनुसार शैक्षणीक अर्हतेप्रमाणे मंजूर पदाच्या ५ टक्के मर्यादेत प्रशिक्षणार्थी उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार आहे.