अमरावती : अमरावती जिल् तील रहिमापूर येथे दोन दिवसांपूर्वी पार पडलेला एक अनोखा विवाह सोहळा चर्चेचा विषय ठरत आहे. कारण लग्नाच्या मंडपात ८० वर्षांच्या नवरदेवाचे ६५ वर्षांच्या नवरीसोबत थाटात लग्न लावून देण्यात आले. अंजनगाव सुर्जी तालुक्यात येणा-या चिंचोली रहिमापूर या ठिकाणी हा विवाहसोहळा पार पडला. सध्या हा विवाहसोहळा ट्रेंडिंगचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे या विवाहसोहळ्यात नवरदेवाचा ५० वर्षीय मुलगा वरातीत डान्स करताना दिसत होता.
अमरावतीतील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चिंचोली रहिमापूर येथील रहिवासी असणारे ८० वर्षे वयाचे विठ्ठल खंडारे यांच्या पत्नीचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांना चार मुले, मुली, नातवंडे, नातसुना असा गोतावळा आहे. नातलगांचा भलामोठा गोतावळा असतानाही विठ्ठल खंडारे यांना विरह टोचत होता. ऐन ८० वर्षांत विठ्ठल यांनी पत्नी गेल्यानंतर काही वर्षांनी आपल्याला लग्न करायचे, असा विचार मुलांसमोर मांडला. सुरुवातीला मुलांनी त्यांच्या या निर्णयाला विरोध दर्शवला.
बापासाठी लेकाने बघितली नवरी
मात्र, विठ्ठलराव खंडारे यांचा लग्नाचा हट्ट कायम असल्यामुळे मुलांनी देखील आपल्या वडिलांचं लग्न लावून देण्याची तयारी दर्शवली. विठ्ठल यांच्या मुलांनी वडिलांसाठी नवरी शोधायला सुरुवात केली. बायोडाटा, दिसायला हॅण्डसम, जॉब, पैसा, फ्लॅट अशा अपेक्षा नवरीबाईला नसल्याने तसे मुलगी शोधणे थोडे सोपे गेले. पण, वयाचा विचार करता नवरी शोधणे अवघड झाले होते. मात्र, तरीही बापासाठी लेकाने नवरी बघायला सुरुवात केली. बापाचा हट्ट पूर्ण करायचाच, असा निर्धारच जणू काय या मुलांनी केला होता.