23.2 C
Latur
Tuesday, March 10, 2026
Homeमहाराष्ट्र८६ हजार एसटी कर्मचा-यांना दिलासा

८६ हजार एसटी कर्मचा-यांना दिलासा

वेतनवाढीचा थकित हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा

मुंबई : प्रतिनिधी
राज्याच्या कानाकोप-यात धावणा-या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणा-या सुमारे ८६ हजार एसटी कर्मचा-यांच्या चेह-यावर अखेर समाधानाची झळाळी उमटली आहे. वेतनवाढीचा थकित हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा होताच, दिलेला शब्द पाळणा-या परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वासाची मोहर उमटली.

एसटी महामंडळाकडे निधीअभावी थकित वेतन देणे कठीण झाले असताना शासनाने तातडीने १०० कोटी रुपयांची तरतूद केली. परिणामी, फेब्रुवारी महिन्याच्या थकित वेतनवाढीचा हप्ता कर्मचा-यांच्या खात्यात जमा झाला. हा केवळ आर्थिक दिलासा नसून, तो शासनाच्या संवेदनशीलतेचा आणि बांधीलकीचा प्रत्यय आहे, असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

यापूर्वी ऑक्टोबर २०२५ मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालीन उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या सहमतीने कामगार संघटनांच्या बैठकीत दरमहा सुमारे ६५ कोटी रुपयांचे अनुदान देण्याचे घोषित केले होते. त्यानुसार डिसेंबरपासून थकित हप्त्यांची प्रक्रिया सुरू झाली. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे फेब्रुवारीत निधीअभावी हप्ता देणे अशक्य झाले आणि कर्मचा-यांमध्ये नाराजीची लाट उसळली.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मंत्री सरनाईक यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी सातत्याने चर्चा करत २१० कोटी रुपयांची मागणी केली. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आणि त्यापैकी १०० कोटी रुपयांचा निधी तत्काळ उपलब्ध झाला. उर्वरित रक्कमही लवकरच प्राप्त होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. २४ फेब्रुवारी रोजी सर्व कर्मचा-यांच्या खात्यात वेतनवाढीचा हप्ता जमा होताच, नाराजीचे ढग दूर झाले आणि विश्वासाचा सूर्य पुन्हा तेजाने उगवला. ‘दिलेला शब्द पाळला,’ अशी भावना व्यक्त करत कर्मचा-यांनी मंत्री सरनाईक यांचे मनापासून आभार मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR