Homeलातूर८,९१६ जणांची मोफत नेत्र तपासणी; ७६९ जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार 

८,९१६ जणांची मोफत नेत्र तपासणी; ७६९ जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार 

लातूर : प्रतिनिधी
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख यांच्या पुढाकारातून दि. १८ एप्रिल रोजी सर्वात मोठा ‘आरोग्य जागर’ आयोजित करण्यात आला होता. जिल्हाभरात एकचवेळी १३ ठिकाणी झालेल्या शिबिरांत ८ हजार ९१६ पेक्षा अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी व ७६९ नागरिकांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.  ग्राहकांना उत्तम व तत्पर सेवा देण्याबरोबरच विविध सामाजिक उपक्रम राबवून लोकहिताचे कार्य करण्याची परंपरा लातूर जिल्हा बँकेने कायम ठेवली आहे. जिल्हा बँकेचे आधारस्तंभ दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बँकेने शनिवारी भव्य मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आयोजित केले होते.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी, या उद्देशाने जिल्हा बँकेचे अध्यक्ष  धिरज विलासराव देशमुख साहेब यांच्या संकल्पनेतून या आरोग्य शिबिराचे नियोजन करण्यात आले होते. जिल्ह्यात १३ ठिकाणी सकाळी ९ वाजल्यापासून शिबिराला सुरवात झाली. ग्रामीण भागात सायंकाळी उशिरापर्यंत शिबिर सुरू होते. अनेक तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका या शिबिरात उपचारासाठी सहभागी झाल्या होत्या. सतर्क आरोग्य यंत्रणा, उत्तम नियोजन आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हा सर्वात मोठा आरोग्य जागर ठरला.
ग्रामीण रुग्णालय बाभळगाव, सार्वजनिक स्टेज सभागृह बोरगाव काळे, माता रमाई आंबेडकर रुग्णालय सम्राट चौक लातूर, पांडुरंग मंगल कार्यालय दिपज्योती नगर लातूर, बाजार समिती सभागृह रेणापूर, यादव मंगल कार्यालय बेलकुंड, जिजाऊ चौक निलंगा, बिराजदार नेत्र रूग्णालय शाहू चौक उदगीर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभागृह तिरुका, ग्रामीण रुग्णालय अहमदपूर,  ग्रामीण रुग्णालय चाकूर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परिसर शिरूर अनंतपाळ, बोरोळ चौक देवणी येथे शिबिर संपन्न झाले. या प्रत्येक ठिकाणी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अशा प्रकारचे उपक्रम यापुढेही राबवले जातील, असे जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख साहेब यांनी सांगितले. मोतीबिंदू निदान झालेल्या रुग्णांची आरोग्य तपासणी करून शस्त्रक्रियेसाठी पात्र असणा-या रुग्णांच्या शस्त्रक्रिया टप्प्याटप्प्याने मोफत केल्या जातील असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR