पुणे : प्रतिनिधी
एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ (एमआयटी एडीटी), विश्वराजबाग, पुणे या विद्यापीठाचा ८वा दीक्षांत समारंभ शनिवार, दि. ८ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजता मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार आहे. यंदाचा समारंभ राजस्थानचे राज्यपाल मा. श्री. हरिभाऊ बागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत, तर विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या अध्यक्षतेखाली, स्वामी विवेकानंद मंडप, विश्वराजबाग, लोणी काळभोर येथे संपन्न होणार आहे. यंदा एकूण ३३३४ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मंडी, हिमाचल प्रदेशचे संचालक प्रा. डॉ. लक्ष्मीधर बेहरा यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तसेच, एमआयटी एडीटी विद्यापीठाकडून भारत सरकारच्या तंत्रज्ञान, नवोन्मेष, उष्मायन व उद्यमशीलता क्षेत्रातील राष्ट्रीय तज्ज्ञ सल्लागार परिषदेचे अध्यक्ष रामानन रामनाथन यांना विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी प्रदान करण्यात येणार आहे. तर ‘ग्लास मॅन ऑफ इंडिया’ म्हणून परिचित आणि गोल्ड प्लस ग्लास इंडस्ट्रीजचे चेअरमन सुभाष त्यागी यांना औद्योगिक नेतृत्वाबद्दल ‘डॉक्टर ऑफ लेटर्स’ या मानद पदवीने सन्मानित केले जाणार आहे.
एमआयटी एडीटी विद्यापीठाची २०१५ साली स्थापना झाल्यापासूनची प्रगती उल्लेखनीय आहे. यंदाच्या दीक्षांत समारंभात २१ विद्यार्थ्यांना पीएच.डी., २१ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, तर १९५ विद्यार्थ्यांना रँक होल्डर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
आजपर्यंतच्या सात दीक्षांत समारंभांत, माजी राज्यपाल व विद्यमान उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप नेते विनोद तावडे, इस्त्रोचे माजी चेअरमन पद्मविभूषण डॉ. जी. माधवन नायर, माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, डीआरडीओचे माजी चेअरमन डॉ. जी. सतीश रेड्डी, इस्त्रोचे विद्यमान चेअरमन डॉ. एस. सोमनाथ आदी मान्यवरांनी हजेरी लावली आहे.
उत्सुकता शिगेला : प्रा. डॉ. मंगेश कराड
‘यंदा दीक्षांत समारंभात २१ पीएच.डी., २१ सुवर्णपदकांसह एकूण ३३३४ विद्यार्थ्यांना एमआयटी एडीटी विद्यापीठाकडून पदवी प्रदान करण्यात येणार आहे. या निमित्ताने राज्यपाल हरिभाऊ बागडे, प्रा. डॉ. लक्ष् मीधर बेहरा, रामानन रामनाथन आणि सुभाष त्यागी प्रथमच विद्यापीठात येत असल्याने, विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांमध्ये उत्सुकता शिगेला पोचली आहे.’

