जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला असून, शेतक-यांच्या चेह-यावर पुन्हा समाधानाचे हास्य फुलले आहे. जून महिन्याच्या अखेरीस झालेल्या दमदार पावसावर शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात पेरण्या पूर्ण केल्या होत्या मात्र त्यानंतर तब्बल वीस दिवस पावसाने दडी मारल्याने उगवलेली पिके करपू लागली होती आणि शेतक-यांची चिंता वाढली होती. या आठवड्यात झालेल्या रिमझिम पावसामुळे सोयाबीन, उडीद, मूग, तूर, कापूस आदी खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. पिकांची वाढ पुन्हा जोमाने सुरू झाली असून शेतांमध्ये हिरवाई पसरली आहे.
तालुक्यात यंदा सुमारे ३० हजार हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्रापैकी ९८ टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जूनच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहिले होते तसेच अनेक साठवण तलावांमध्ये समाधानकारक पाणीसाठा निर्माण झाला होता. त्यानंतर आलेल्या दीर्घ उघडीपामुळे पिकांची वाढ खुंटली होती मात्र आता झालेल्या रिमझिम पावसामुळे खरीप पिकांना मोठा आधार मिळाला आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते, पुढील काही दिवसही अधूनमधून पाऊस सुरू राहिल्यास पिकांची वाढ अधिक चांगली होईल आणि उत्पादनात वाढ होण्यास मदत मिळेल. सध्या शेतकरी तणनियंत्रण, खत व्यवस्थापन आणि आंतरमशागतीच्या कामांना वेग देत आहेत. एकूणच, रिमझिम पावसामुळे जळकोट तालुक्यातील खरीप हंगामाला नवसंजीवनी मिळाली असून शेतक-यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
















