लातूर : प्रतिनिधी
विलास सहकारी साखर कारखाना, वैशालीनगर, निवळी येथे आगामी गळीत हंगामाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. गळीत हंगाम वेळेवर आणि पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी केली जात आहे. याच तयारीचा एक भाग म्हणून दि. २० जून रोजी कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख आणि सर्व संचालकांच्या उपस्थितीत करण्यात आले. या पूजनानंतर सर्व संचालकांच्या उपस्थितीत गळीत हंगाम तयारीबाबत आढावा बैठकही झाली. या वेळी येणा-या हंगामात ९ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
विलास कारखाना कार्यक्षेत्रात गळीत हंगाम २०२५-२६ साठी उसाचे मोठे क्षेत्र उपलब्ध आहे त्यामुळे कार्यक्षेत्रातील उसाचे वेळेवर गाळप होण्यासाठी कारखान्याचे संस्थापक चेअरमन, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा माजी पालकमंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख आणि चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी गळीत हंगाम लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या अनुषंगाने सर्व हंगामपूर्व यंत्रसामुग्री देखभाल व दुरूस्तीची कामे प्रगतिपथावर असून मागील गळीत हंगामाप्रमाणेच येणारा हंगामही यशस्वी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. आगामी गळीत हंगामासाठी कारखाना कार्यक्षेत्रात पुरेसा ऊस उपलब्ध आहे. कारखान्याकडे सभासदांच्या १४८९३.३७ हेक्टर तर बिगर सभासदांच्या ५७९० हेक्टर अशा एकूण २०६८७ हेक्टर उसाची नोंदणी झाली आहे.
विलास साखर कारखान्याने ऊस तोडणीचे योग्य नियोजन केले असून या हंगामात जास्तीत जास्त ऊस हा तोडणी यंत्राद्वारे तोडणी करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात कारखान्यामार्फत १५ हार्वेस्टर खरेदी केले जाणार आहेत. भविष्यात उसाची उपलब्धता पाहता १०० टक्के ऊस तोडणी यंत्राद्वारे केल्यानंतर उसाचे गाळप करण्यासाठी आवश्यक असणारी मशिनरी बसविण्यात येत आहे. या हंगामात तांत्रिक कारणांमुळे कारखाना बंद तास कमी राहतील याची दक्षता घेतली जाणार आहे. हंगाम बंद असताना सुरू असलेली मशिनरी देखभाल व दुरूस्तीची कामे प्रगतिपथावर असून हंगाम सुरू होण्याअगोदरच कारखाना गळीत हंगामासाठी सज्ज असेल. कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी ही माहिती दिली आहे.
मिल रोलर पूजन कार्यक्रमास माजी आमदार व्हाईस चेअरमन वैजनाथराव शिंदे, ट्वेंटीवन शुगर्सचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, कार्यकारी संचालक संजीव देसाई, डॉ. सारिका देशमुख, माजी व्हाईस चेअरमन विद्यमान संचालक रवींद्र काळे, संचालक सर्वश्री रणजित पाटील, अनंत बारबोले, रसूल पटेल, तात्यासाहेब पालकर, गोवर्धन मोरे, हणमंत पवार, नरसिंग बुलबुले, नेताजी साळुंके (देशमुख), नितीन पाटील, रामराव साळुंके, अमृत जाधव, सतीश शिंदे (पाटील), दीपक बनसोडे, लताबाई देशमुख, शाम बरुरे, सुभाष माने, रमेश देशमुख आदी उपस्थित होते.