31.1 C
Latur
Saturday, July 19, 2025
Homeमहाराष्ट्रअंधश्रद्धेतून लघवी पाजण्याचा किळसवाणा प्रकार

अंधश्रद्धेतून लघवी पाजण्याचा किळसवाणा प्रकार

भोंदू बाबाचा आघोरी खेळ

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शिऊर गावात अंधश्रद्धेचा एक धक्कादायक आणि अमानुष प्रकार समोर आला आहे. येथील बिरोबा मंदिर परिसरात संजय रंगनाथ पगार या भोंदू बाबाने गेल्या अनेक महिन्यांपासून लोकांच्या अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत अघोरी कृत्ये केल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केला असून, वैजापूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
संजय पगार हा भोंदू बाबा लग्न होत नाही, मूल होत नाही, भूतबाधा झाली आहे अशा खोट्या थापा मारून अशिक्षित आणि अंधश्रद्धाळू लोकांना आपल्या जाळ्यात ओढत होता. बिरोबा मंदिर परिसरात तो मंत्रांचा जप करत अघोरी कृत्ये करायचा. त्याच्या या कृत्यांमध्ये अनेक अमानुष प्रकारांचा समावेश होता.

बाधित व्यक्तीला जमिनीवर झोपवून त्याच्या मानेवर पाय ठेवणे आणि पोटावर काठी ठेवून धमकावणे. तसेच व्यक्तीला लघवी पाजणे आणि नाकाला बूट लावणे. भूतबाधेच्या नावाखाली लोकांना भीती दाखवून त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे. या सर्व कृत्यांचा व्हीडीओ पुरावा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला, ज्यामध्ये बाधित व्यक्ती निमूटपणे हे अत्याचार सहन करत असल्याचे दिसून आले आहे.

हा धक्कादायक प्रकार १७ जुलै रोजी दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आला. तक्रारदार किशोर शांताराम आघाडे (वय ४०) यांनी वैजापूर पोलिस ठाण्यात सरकारतर्फे तक्रार नोंदवली. व्हीडीओ पुराव्याच्या आधारे पोलिसांनी संजय पगार याच्याविरुद्ध महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायदा २०१३ आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR