पालम : नवी मुंबई बेलापूर येथील अक्षदा म्हात्रे (वय ३०) या विवाहित महिलेवर अत्याचार करून तिची हत्या करणा-या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी पालम येथील सर्व समाज बांधवांच्या वतीने तहसील कार्यालय मार्फत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, बेलापूर येथील विवाहीता म्हात्रे यांचा पती व सासरच्या सोबत वाद झाल्यानंतर त्या बेलापूर येथील घरातून दि.६ जुलैला रागारागाने घराबाहेर पडल्या.
त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील शिळफाटा टेकडीवरील घोळ गणपती मंदिरावर असलेल्या श्रद्धेपोटी या मंदिरात आश्रय घेतला असता या मंदिरात असणा-या उत्तर भारतीय पुजारी व सेवेकरी श्याम सुंदर शर्मा (६५, राजस्थान), संतोष कुमार मिश्रा (४५ उत्तर प्रदेश), राजकुमार पांडे (५४, उत्तर प्रदेश) यांनी म्हात्रे यांचा विश्वास संपादन करून नशेचा पदार्थ चहामध्ये देत बेशुद्ध अवस्थेत पुजारी व सेवेकरांनी तिच्यावर रात्रभर अत्याचार केला.
यानंतर सदर घटना उघडकीस येऊ नये म्हणून तिघांनी तिची निघृन हत्या करून तिचा मृतदेह एका खड्ड्यात फेकून दिला. सदर प्रकरण दि.९ जुलै रोजी उघडकीस आल्यानंतर पुजारी व सेवेकरी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. सदर पुजारी व सेवेकरांनी अत्याचार करून खून केल्याची कबुली पोलिसांकडे दिलेली आहे. सदर केस फास्ट कोर्टामध्ये चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. तसेच अशा घटना घडू नयेत यासाठी कठोर पावले उचलावीत अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.