अर्धापूर : प्रतिनिधी
भोकरफाटा ते बारड रोडवरील आमराबाद पाटी जवळ एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक देवून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात दि. २३ मे रोजी सायंकाळी साडेचार वाजताचे सुमारास घडला.
याबाबत अधिक माहीती अशी की, शिवानंद दिलीप जोंधळे (वय २७ वर्षे) रा. आंबेगांव ता. अर्धापूर जिल्हा नांदेड हे आपल्या मोटारसायकल क्रं. एम. एच. – २६ – बी. एम. – ४१४४ ने बारडकडून नांदेडकडे जात असतांना आमराबाद पाटी जवळ एका अज्ञात वाहनाने त्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील शिवानंद दिलीप जोंधळे हा तरुण गंभीर जखमी झाला.
अपघाताची माहीती मिळताच भोकर फाटा येथून चोवीस तास मोफत सेवा देणा-या श्रीमद जगद्गुरु रामानंदचार्य श्री नरेंद्रचार्य संस्थानच्या रुग्णवाहिकेचे चालक राजू पाचंगे यांनी तात्काळ अपघातस्थळी भेट देऊन आपल्या रुग्णवाहिकेतून त्या जखमीला अर्धापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.
















