नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत अनुदानित एलपीजी सिलिंडरची वार्षिक मर्यादा नऊवरून चारवर आणली. यावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या आर्थिक आणि परराष्ट्र धोरणांवर टीका केली. १२ वर्षांच्या गरीबविरोधी आर्थिक धोरणांमुळे आणि तडजोडीच्या परराष्ट्र धोरणामुळे देश अशा परिस्थितीत येऊन पोहोचला आहे, जिथे लाखो गरीब कुटुंबे आणि महिलांना विषारी लाकडाचा धूर श्वासावाटे आत घेण्यास भाग पडत आहे.
काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले की, उज्ज्वला योजनेअंतर्गत अनुदानित सिलेंडरची संख्या नऊवरून चारवर आणली. इतकेच नाही तर गेल्या तीन महिन्यांत घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात ८९ रुपयांची वाढ केली. याचा अर्थ आधी किंमत वाढवा, मग अनुदान कमी करा आणि गरिबांच्या चुली विझवा. स्थलांतरित मजुरांची जीवनरेखा असलेल्या ५ किलोच्या सिलिंडरच्या दरात ३२३ रुपयांची वाढ केली. ते काय कमावणार, काय खाणार आणि काय वाचवणार, असा प्रश्नही राहुल गांधी यांनी उपस्थित केला.
अब्जाधीश मित्रांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ करणे आणि स्वत:च्या अपयशाचे बिल गरिबांच्या माथी मारणे हे मोदींच्या लुटीचे मॉडेल असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. मोदीजी तुमच्या अपयशाचा भार फक्त गरीबच उचलणार का, तुम्ही निर्माण केलेल्या या ढासळत्या अर्थव्यवस्थेची किंमत कामगार, शेतकरी, महिला आणि मध्यमवर्ग चुकवणार का, असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला.
आधी मिळायचे १२ सिलिंडर
२०१६ मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पूर्वी दरवर्षी प्रत्येकी १४.२ किलोचे १२ अनुदानित सिलिंडर मिळत होते. गेल्या वर्षी अनुदानित सिलिंडरची संख्या नऊवर आणण्यात आली होती आणि आता ती आणखी कमी करून चार करण्यात आली.
















