मुंबई : प्रतिनिधी
मुंबईत अभिनेत्री आणि सुझान खानची आई झरीन खान यांच्या निधनानंतर त्यांच्या प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते जितेंद्रही सहभागी झाले होते. मात्र या दरम्यान एक अनपेक्षित प्रसंग घडला. प्रार्थना सभेतून बाहेर पडताना जितेंद्र यांचा तोल गेला आणि ते जमिनीवर पडले.
घटनेदरम्यान जितेंद्र यांच्यासोबत त्यांचे सहाय्यक कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी त्वरित त्यांना आधार देत उभे केले आणि काही क्षणांतच त्यांना स्थिर केले. सुदैवाने त्यांना गंभीर दुखापत झालेली नाही, मात्र काही क्षणांसाठी सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले.
जितेंद्र यांचे वय सध्या ८३ वर्षे आहे. या वयातही ते अजूनही विविध कार्यक्रमांना उपस्थित राहतात, यामुळे त्यांच्या फिटनेसबद्दल चाहत्यांमध्ये कौतुक असते.
सोशल मीडियावर एक व्हीडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दिसतं की, जरीन खान यांच्या प्रार्थना सभेत जाताना अभिनेते जितेंद्र यांचा तोल अचानक जातो आणि ते जमिनीवर पडतात. पण सिक्युरिटी गार्डने दक्षता बाळगत पटकन त्यांची मदत केली आणि त्यांना पुन्हा उभे केले.
अभिनेते जितेंद्र यांचे फॅन्स हे वृत्त ऐकून चिंतेत पडले. पण, त्यांना कुठलीही दुखापत झाली नसून फॅन्सचा जीव भांड्यात पडला आहे. प्रार्थना सभेतून परतताना जितेंद्र यांनी हसत पापाराझींची भेट घेतली.

