नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी जाणा-या भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक गंभीर चिंता निर्माण झाली आहे. नवीन अहवालानुसार, यंदा भारतातून अमेरिकेत शिक्षणासाठी जाणा-या विद्यार्थ्यांच्या संख्येत ७० ते ८० टक्क्यांनी घट झाली आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे व्हिसा अपॉईंटमेंट स्लॉट्स उपलब्ध न होणे, तसेच व्हिसा नाकारण्याच्या घटनांमध्ये झालेली मोठी वाढ, हे आहे.
दरम्यान, स्लॉट्स लवकरच खुले झाले नाहीत तर हजारो विद्यार्थ्यांची स्वप्ने भंगतील. त्यामुळे शिक्षणासाठी काही विद्यार्थी आता इतर पर्यायांचा शोध घेत असून अनेक विद्यार्थ्यांची पावले जर्मनीच्या दिशेने वळत असल्याचे समजते.
हैदराबादमधील विविध शिक्षण परामर्श केंद्रांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांतील ही सर्वांत वाईट स्थिती आहे. दरवर्षी या वेळेत बहुतेक विद्यार्थी व्हिसा मुलाखती पूर्ण करून उड्डाणासाठी तयारी करत असतात. पण यंदा विद्यार्थी दररोज पोर्टल रिफ्रेश करत आहेत – केवळ अपॉईंटमेंट स्लॉट्ससाठी. ही स्थिती खूपच गोंधळाची आहे. अमेरिकन अधिका-यांनी टप्प्याटप्प्याने स्लॉट्स उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते, पण अजून काहीच स्पष्ट नसल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.
या गोंधळामुळे अनेक विद्यार्थी आता जर्मनी, कॅनडा, ऑस्ट्रेलिया यांसारख्या पर्यायी देशांकडे वळत आहेत. एका २३ वर्षीय विद्यार्थ्याने सांगितले, अधिक वेळ थांबू शकलो नाही. वर्ष वाया जाईल असे वाटते. म्हणून मी अर्ज मागे घेतला आणि आता जर्मनीत मास्टर्ससाठी अर्ज करत आहे. विशेष म्हणजे, अनेक विद्यार्थ्यांचे प्रोफाईल स्वच्छ असूनही त्यांना नकार मिळत आहे. हे नवीन नाही, पण यावेळी अंमलबजावणी अधिक तीव्रपणे होत आहे.