अहमदपूर/चाकूर : प्रतिनिधी
राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या पुढाकारातून अहमदपूर व चाकूर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीला ग्रामपंचायत इमारतीसाठी शासनाने ७५ लाख रुपये निधी मंजूर केला असून अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव व चाकूर तालुक्यातील चापोली व घरणी या ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीसाठी प्रत्येक ग्रामपंचायत साठी २५ लक्ष असे ७५ लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच इतर प्रशासकीय बाबी पूर्ण होऊन या इमारतीचे काम सुरू होणार असल्याची माहिती राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
अहमदपूर-चाकूर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीच्या इमारती ह्या खिळखिळे झाल्या होत्या. यामुळे प्रशासनाचा कारभार हाकणे हे मोठ्या प्रमाणात जिकरीचे होत होते, हे लक्षात घेत राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या इमारतीसाठी ग्रामविकास विभागाकडे पाठपुरावा करून ढाळेगाव ग्रामपंचायतसाठी २५ लक्ष रुपये, चापोली ग्रामपंचायतीसाठी २५ लक्ष रुपये व घरणी ग्रामपंचायतीसाठी २५ लक्ष रुपये असा एकूण ७५ लक्ष रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करून घेतला असून लवकरच इमारतीचे काम पूर्णत्वास येणार आहे. या निधी मुळे ग्रामपंचायतीचा कारभार अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.