मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पत्रकारांसाठी एक मोठा निर्णय घेण्याचा संकेत दिला आहे. लालपरीने प्रवास करणा-या नागरिकांसाठी आतापर्यंत महिलांना ५० टक्के सवलत, ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के मोफत प्रवास आणि विद्यार्थ्यांसाठी विविध योजना लागू करण्यात आल्या आहेत. त्यात आता पत्रकारांसाठी मोफत प्रवासाची सवलत अधिक व्यापक केली जाणार आहे.
राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयात व विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पदाधिका-यांसमवेत घेतलेल्या बैठकीत या निर्णयाचे संकेत दिले आहेत. यामुळे पत्रकारांना एसटी प्रवासात आणखी सवलती आणि सुविधा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सध्या अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना साधी, निमआराम व शिवशाही (आसनी/शयनयान) बसमध्ये मोफत प्रवासाची सवलत मिळते. मात्र, यावर ८,००० कि.मी.ची वार्षिक मर्यादा होती. ही मर्यादा रद्द करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे. ही मागणी पत्रकारांकडून अनेक दिवसांपासून होत होती.
या निर्णयामुळे राज्यभरातील पत्रकारांना अधिक व्यापक प्रमाणात प्रवास करता येणार आहे. विशेषत: ग्रामीण भागात रिपोर्टिंगसाठी एसटीचा पर्याय अधिक उपयुक्त ठरणार आहे. पत्रकारांचे कार्य अधिक सुलभ व्हावे या हेतूने ही योजना विस्तारण्यात येणार आहे.
सर्व प्रकारच्या एसटी बसेसमधून – अगदी शिवशाहीसह – मोफत प्रवासाची सवलत पत्रकारांना लागू करण्याचा विचार सरकार करत आहे. यामुळे एसटीच्या कोणत्याही प्रवासी सेवांचा लाभ अधिस्वीकृतीधारक पत्रकार घेऊ शकतील.
त्याचबरोबर, सध्या पत्रकारांसाठी उपलब्ध नसलेली ऑनलाईन आरक्षण प्रणाली देखील लवकरच सुरू करण्यात येणार आहे. ही सुविधा पुढील महिन्यापासून लागू होण्याची शक्यता असून त्यामुळे पत्रकारांना पूर्वनियोजन करून प्रवास करता येईल, आणि त्यांची कामे अधिक वेळेत व सोयीस्कर पूर्ण होतील.