मुंबई : प्रतिनिधी
छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक शौर्यगाथा असलेल्या ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून बॉक्स ऑफिसवरही दमदार यश मिळवले आहे. १०० कोटींच्या जवळ पोहोचलेल्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबाबत सध्या चर्चांना उधाण आले आहे. अशातच ‘राजा शिवाजी’ ऑनलाईन नेमका कधी आणि कुठे पाहायला मिळणार, याबाबत
चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
मराठी सिनेसृष्टीतील भव्य चित्रपटांपैकी एक म्हणून ‘राजा शिवाजी’चे कौतुक केले जात आहे. या पीरियड ड्रामाच्या ‘ओटीटी’ रिलीजची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. साधारणपणे बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करणा-या चित्रपटांना ‘ओटीटी’ वर येण्यासाठी ४५ ते ६० दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे ‘राजा शिवाजी’बाबतही असेच चित्र पाहायला मिळू शकते.
मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही आणि रिलीज डेटही निश्चित करण्यात आलेली नाही. थिएटरमध्ये ‘राजा शिवाजी’मराठी आणि हिंदी भाषेत रिलीज करण्यात आला आहे. मात्र ‘ओटीटी’वर रिलीज होताना हा चित्रपट पॅन इंडिया पातळीवर सादर केला जाईल, अशी चर्चा आहे. त्यानुसार चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा सहा भाषांमध्ये उपलब्ध होऊ शकतो.
‘ओटीटी’ डीलसाठी कोट्यवधींचा व्यवहार?
काही माध्यम वृत्तानुसार ‘राजा शिवाजी’च्या डिजिटल राईट्सची डील चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच पूर्ण झाली होती. या चित्रपटाचे ‘ओटीटी’ हक्क ९० कोटी रुपयांहून अधिक रकमेत विकले गेल्याची चर्चा आहे. गेल्या दहा वर्षांपासून अभिनेते रितेश विलासराव देशमुख यांनी या चित्रपटावर काम केले आहे.
१ मे रोजी चित्रपट प्रदर्शित
महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर म्हणजेच एक मे रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. अवघ्या १३ दिवसांत या चित्रपटाने ९२.८१ कोटी रुपयांचे ग्रॉस कलेक्शन केले. दुस-या आठवड्याच्या शेवटी चित्रपट १०० कोटींचे कलेक्शन करणार का ? याकडे अजूनही प्रेक्षकांचे लक्ष आहे. अभिनेते रितेश विलासराव देशमुख यांनी या चित्रपटात मुख्य भूमिकेसोबतच दिग्दर्शकाची जबाबदारीही सांभाळली आहे.
















