मुंबई : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या महाराष्ट्रात परतणार असल्याचे निश्चित झाले आहे. पण त्या डीजीपी होणार की मुंबई पोलिस आयुक्त म्हणून पदभार सांभाळणार, याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत. तोपर्यंत डीजीपीपदाचा अतिरिक्त पदभार हा मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे देण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने शुक्रवार, दि. २९ डिसेंबर रोजी बैठक घेतली. यावेळी महासंचालक पदासाठी तीन अधिका-यांच्या नावांची यादी त्यांनी पाठवली. यामध्ये सर्वात आधी नाव हे रश्मी शुक्ला यांचे आहे. पण त्यांना महासंचालकपदी बसवले जाणार की मुंबई पोलिस आयुक्त म्हणून त्यांची वर्णी लागणार याचा निर्णय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री मिळून घेणार आहेत.
दरम्यान उद्यापासूनच महासंचालकपदाचा अतिरिक्त पदभार मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर स्विकारतील. मुंबईचे महासंचालक रजनीश शेठ हे आजच निवृत्त झाले. त्यामुळे अद्याप रश्मी शुक्ला यांना महाराष्ट्रात येण्यास थोडा वेळ असून या कालावधीत त्यांच्याकडे कोणता पदभार द्यायचा यासंदर्भातील निर्णय घेण्यात येईल.
पुणे पोलिसांनी वरिष्ठ पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर करण्यात आलेल्या फोन टॅपिंग प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. यामध्ये काँग्रेस नेते नाना पटोले यांचा फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप आहे.