यंदा वातावरणीय बदलामुळे पाऊस बराच लांबला होता. त्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने हिवाळा थोडा उशिरा सुरू झाला. आता मात्र कडाक्याची थंडी पडली आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये लोक गुलाबी थंडीचा अनुभव घेऊ लागले आहेत. राज्यात एकीकडे थंडीचा प्रभाव वाढत असताना प्रदूषणाची पातळीही वाढत आहे. सर्वच प्रमुख शहरांमध्ये ही प्रदूषण पातळी स्थानिक नागरिकांसाठी घातक असून निर्धारित मानकांपेक्षा हे निर्देशांक अधिक असल्याचे दिसून येत आहे. राज्यात गत काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढत असून तापमानात सातत्याने घट होत आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. आता अनेक ठिकाणी गारठा वाढला आहे. वातावरणातील बदलामुळे लोकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. ऐन नोव्हेंबरमध्ये काही ठिकाणी कडाक्याची थंडी पडल्याने सकाळी व रात्रीच्या वेळी शेकोट्या पेटत आहेत. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात आधीच कमी तापमान नोंदवले गेले असताना तापमानाचा पारा आणखी खाली जाण्याची शक्यता आहे.
वातावरणातील बदलामुळे विविध आजार बळावले असून रुग्णसंख्येत वाढ होत आहे. थंडीमुळे न्युमोनिया, सर्दी, खोकला, कावीळ, दमा, त्वचेवर खाज असे विविध आजार बळावले आहेत. वातावरणातील बदलानंतर थंडीचा प्रभाव सर्वांत आधी होतो तो आपल्या त्वचेवर. त्वचा कोरडी पडणे, ओठ फाटणे, पायांच्या चिरांत वाढ, त्वचा लाल होणे अशा समस्या सुरू होतात. या सर्वांवर वेळीच उपचार न केल्यास त्वचेचे नुकसान होऊ शकते. थंडी वाढल्याने अनेकांचे कपाटात गेलेले स्वेटर, कानटोप्या पुन्हा बाहेर निघू लागल्या आहेत. सध्या राज्यासह देशभरात थंडी वाढल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला असून उत्तरेकडील थंड वारे राज्याच्या दिशेने वाहत असल्याने बहुतांश भागात किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील किमान तापमान २ ते ८ अंश सेल्सिअसने घसरले आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात गुलाबी थंडीची लाट पसरली आहे. हिवाळ्याचा तडाखा वाढल्याने जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. सकाळी दाट धुक्याची चादर पसरत असल्याने दृश्यमानतेतही घट होत आहे. रस्त्यावरील वाहतूकही मंदावत आहे. रस्त्यावर सकाळी आणि रात्री फारच कमी नागरिक दिसत आहेत. शालेय मुलांना थंडीचा सर्वाधिक त्रास होत असल्याने अनेक ठिकाणी शाळा उशिरा सुरू करण्याची मागणी पालक करीत आहेत. मुंबईकरही थंडीची हुडहुडी अनुभवत आहेत.
मुंबई, उपनगर, ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि रायगडमध्येही थंडीचा कडाका वाढला आहे. पहाटेच्या वेळी नागरिकांना गुलाबी थंडीचा अनुभव येत आहे. पुणेकरांना देखील थंडी जाणवू लागली आहे. अनेक ठिकाणी पहाटेच्या वेळी शेकोट्या पेटल्याचे दिसून येत आहे.उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये थंडीचा कडाका वाढत असतानाच महाराष्ट्रावरही या शीतलहरींचा परिणाम झाला आहे. विशेषत: उत्तर महाराष्ट्रात तापमानाने निचांकी आकडा गाठला असून विदर्भ आणि कोकणही या थंडीच्या लाटेत सापडला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात थंडीचा कडाका वाढत असून पारा दिवसागणिक घटताना दिसत आहे. मुंबई शहर व उपनगरात पहाटेच्या वेळी तापमानात घट होत असून दुपारच्या वेळी मात्र प्रचंड उष्मा जाणवत आहे. केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार पुढील ४८ तासांत दक्षिण भारतात पावसाची हजेरी लागू शकते.
केरळ, तामिळनाडू, अंदमान- निकोबार बेट समूह आणि लक्षद्वीपच्या बहुतांश भागात पाऊस होऊ शकतो. पूर्वोत्तर भारतातील अरुणाचल प्रदेश आणि नजिकच्या भागातही पावसाची शक्यता आहे. मेघालयातील काही भागात पाऊस तर डोंगराळ भागात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. काश्मीर खोरे, गुलमर्ग, पहलगाम, श्रीनगर येथे बर्फवृष्टी सुरू असल्याने तापमान शून्याच्याही खाली गेले आहे. हवामान विभागाने या भागासाठी १६ नोव्हेंबरनंतर नव्याने पश्चिमी झंझावात सक्रिय होणार असल्याचा इशारा दिला आहे. हिमाचल प्रदेशात थंडीचा कडाका वाढल्याने दुर्गम भागात राहणा-यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे. पर्यटकांसाठी मात्र कडाक्याच्या थंडीचा अनुभव आनंददायी असू शकतो. उत्तर भारतातील शीत लहरींच्या प्रभावामुळे उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणात तापमान कमी होत चालले आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि घाटमाथा परिसरात कोरडे हवामान राहील. मराठवाड्यात कमाल तापमान ३१ अंश आणि किमान तापमान ११ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, नांदेड, धाराशिव जिल्ह्यांतही कोरडे वातावरण राहून तापमानात घट होईल असा अंदाज आहे. राज्यात सर्वत्र तापमानात घट होत असून थंडीचा जोर दिवसेंदिवस वाढत आहे. पुढील काही दिवसांत तापमान आणखी खाली जाण्याची शक्यता असून थंडीचा कडाका वाढेल. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची आणि थंडीपासून बचावाची विशेष काळजी घ्यावी. संपूर्ण राज्यात दिवसा उन्हाची तीव्रता जाणवेल. मात्र रात्री आणि पहाटे गारठा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. कृषी विभागाने वाढत्या गारठ्याच्या पार्श्वभूमीवर तूर पिकाची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. थंडीचा ऋतू आवडणार नाही असा माणूस अपवादानेच आढळेल. मॉर्निंग वॉक, व्यायाम करण्याचा आनंद थंडीच्या दिवसांत द्विगुणित होतो. गरमागरम चहा, थंडीतले ऊबदार कपडे, शेकोट्या, आल्हाददायक आणि मन प्रसन्न करणारे वातावरण म्हणजे थंडीचे दिवस. अशा या थंडीचा आनंद घेण्यासाठी झटपट शेकोट्या पेटवा!

