लातूर : प्रतिनिधी
नगर परिषद व नगर पंचायत निवडणूकीच्या निवडणूक आयोगाने केलेल्या घोषणेनंतर सर्वच राजकिय पक्षांनी मतदार संघातील मतदारांचा कानोसा, इच्छुक उमेदवार चाचपणी, इच्छुक उमेदवारांचे उमेदवारी मागणी अर्ज स्वीकारणे, मुलाखती सुरू केल्या असून याकरिता प्रदेश काँग्रेसकडून निरीक्षकांच्या निवडी करण्यात आलेल्या आहेत. उदगीरला विलास सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन रविंद्र काळे, निलंगा ट्वेन्टी वन शुगर्सचे व्हाईस विजय देशमुख तर औशासाठी विलास को. ऑप. बँकेचे व्हाईस चेअरमन अॅड. समद पटेल यांची पक्ष निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.
लातूर जिल्ह्यातील उदगीर, निलंगा व औसा नगरपरिषद निवडणुकीकरिता काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख, राज्याचे माजी मंत्री, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक मराठवाडा विभागीय प्रभारी आमदार अमित विलासराव देशमुख, खासदार डॉ. शिवाजी काळगे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख व प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी बाळासाहेब देशमुख यांच्या सूचनेनुसार लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने उदगीरला विलास सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन रविंद्र काळे, निलंगा ट्वेन्टी वन शुगर्सचे व्हाईस विजय देशमुख तर औशासाठी विलास को. ऑप. बँकेचे व्हाईस चेअरमन अॅड. समद पटेल यांची पक्ष निरीक्षक म्हणूनजिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी निवड केली आहे.
लातूर जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकार नुसार, उदगीर नगरपरिषद, निलंगा नगरपरिषद आणि औसा नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली असून, या निर्णयामुळे निवडणुकीच्या प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. रविंद्र काळे, विजय देशमुख, अॅड. समद पटेल यांच्या या निवडीमुळे ते पक्षातील सर्वांना सोबत घेऊन उदगीर, निलंगा व औसा नगर परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकावणार, असा विश्वास अभय साळुंके यांनी व्यक्त केला आहे.

