नाशिक : प्रतिनिधी
कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने राज्यात शेतक-यांचा आक्रोश आहे. केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून १२३५ रुपये क्विंटलने कांदा खरेदी सुरू केली असली तरी प्रत्यक्षात शेतक-यांना काही मिळण्याऐवजी उलट कांदा विक्रीतून त्यांचा खिसा कापला जात आहे. रबी हंगामात परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. नोव्हेंबरपासून कांद्याचे दर सातत्याने उत्पादन खर्चापेक्षा कमी राहिले आहेत. सोलापूर जिल्ह्यात शेतक-याला चार महिन्यांत ४०० कोटींचा तोटा झाला आहे. केंद्र सरकारचा निर्यातबंदी आणि ग्राहकधार्जिण्या धोरणाचा मोठा फटका बसल्याची भावना शेतक-यांमधून व्यक्त होत आहे.
दुसरीकडे अहिल्यानगरच्या श्रीरामपूर बाजार समितीत कांद्याला ३ रुपये ८० पैसे भाव मिळाला आहे. कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी संघटनेने आक्रमक होत बाजार समिती प्रशासनाला धारेवर धरले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरमध्येही कवडीमोल भाव मिळत असल्याने संतप्त शेतक-यांनी कांदा मार्केटमधील लिलाव बंद पाडला आहे.
















