लातूर : प्रतिनिधी
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या वतीने १ डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून निघालेल्या या सायकल रॅलीला आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड व सहाय्यक संचालक संजय ढगे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप एम. ढेले, जिल्हा परिषदेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर बनशेळकीकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक सारडा, वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद कलमे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी बिपीनचंद्र बोर्डे, विभागीय कार्यक्रम व्यवस्थापक पवन वाडकर तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जागतिक एड्स दिनाचे घोषवाक्य ‘अडथळ्यांवर मात करुन, एकजूटीने एचआयव्ही, एड्सला लढा देवू, नवं परिवर्तन घडू’ चा नारा देवून जनजागरण सायकल रॅलीला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज शहीद भगतसिंग चौक येथून पुन्हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे आल्यानंतर सायकल रॅलीचा समारोप करण्यात आला. सायकल क्लबमधील अध्यक्ष, सचिव, सदस्य, विद्यार्थी, विविध संस्थातील अधिकारी, कर्मचारी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. आरोग्य उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड यांनी रॅलीतील उपस्थितांना एचआयव्ही, एड्सचा प्रतिबंध व प्रतिकार करणे तसेच एचआयव्ही, एड्सचे समूळ उच्चाटनासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. सहाय्यक संचालक श्री. ढगे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप एम. ढेले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास दुरुगकर यांनी केले.
रॅलीच्या समारोपप्रसंगी एचआयव्ही, एड्स विषयी रेड रिबन क्लब, दयानंद कला महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांच्या सहभागाने फ्लॅश मॉब उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. या सायकल रॅलीमध्ये लातूर येथील सायकलिस्ट क्लब, सायकल बडीज क्लब, मॉम्स विथ क्लब, कल्याणी महिला तांत्रिक व व्यवसायिक प्रशिक्षण मंडळ, टीआय प्रकल्प व प्राईड इंडिया विहान संस्था, तसेच विविध विभागातील शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.

