छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
कोणतीही निवडणूक असू द्या भाजप नेते रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या कलगीतु-याशिवाय जणू ती अपूर्णच असते. सत्तार नवीन सरकार आल्यापासून महायुतीतच साईडलाईन झालेले आहेत. तर आता नगरपालिका, नगर परिषद निवडणुकीनिमित्त ते सक्रिय झाले. सिल्लोड नगर परिषद निवडणूक त्यांच्यासाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. दरम्यान दानवे यांनी सत्तारांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सिल्लोडमध्ये अनेक जणांची नावं नोंदविण्यात आल्याचा आरोप केला आहे.
सिल्लोडमधील जातीय समीकरण जर आपण पाहिले, तर त्या ठिकाणी जातीय समीकरणाच्या हिशेबाने मतदान होते. सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून आणि गावातील दडपशाहीमधले जे काही प्रकार आमच्या-तुमच्या कानावर येतात, त्या ठिकाणी अस्तित्वात जी राजकीय मंडळी आहे त्यांच्या विरोधात मतदान होईल, असा जोरदार टोला रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तार यांना लगावला.
१६००० मतांची लीड एका माणसाला एका गावात भेटते. त्यामुळे त्यांनी एकदा सोक्षमोक्ष लावावा. भोकरदनमधील जवळपास ३ हजार २५ नावे सिल्लोड शहरात नोंदवल्याचा आरोप रावसाहेब दानवे यांनी केला. अब्दुल सत्तार यांचे जावई, व्याही सा-या नातेवाईकांची बाहेरची नावे आणून सिल्लोडमध्ये टाकलेली आहेत, असा दावा दानवेंनी केला.
आता एसआयआर येत आहे बघू काय होतं ते? परंतु त्या ठिकाणी जातीय समीकरणाचा परिणाम आहे. पण आम्ही चांगल्या मताने निवडून येऊ असा देखील विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. तालुक्यातील सर्व नात्यागोत्यातील नावे सिल्लोडमध्ये नोंदवली आहेत, त्यामुळे त्याची पुनरावृत्ती आता नगर परिषदेच्या निवडणुकीत होईल असे देखील रावसाहेब दानवे यांनी म्हटले.
आमच्या भोकरदनमधला एक मतदार आहे, नारायण सोनवणे असे त्याचे नाव आहे. त्याच मतदाराचे नाव भोकरदनमध्ये सोनवणे नारायण आणि सिल्लोडमध्ये नारायण सोनवणे असे केले आहे आणि फोटो तिथल्या माणसाचा लावलेला आहे. तो फोटो वापरून त्या ठिकाणी त्याने डबल मतदान केले आहे. हे सरळ सरळ अब्दुल सत्तार यांनी केले आहे असा थेट आरोप रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर केला आहे.

