16.2 C
Latur
Tuesday, December 2, 2025
Homeमहाराष्ट्र‘झाडी, डोंगर, हॉटेल फेम शहाजीबापूंच्या कार्यालयासह ४ ठिकाणी धाडी

‘झाडी, डोंगर, हॉटेल फेम शहाजीबापूंच्या कार्यालयासह ४ ठिकाणी धाडी

मुंबई : प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचार सभा अंतिम टप्प्यात असताना संगोल्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील अंतर्गत वाद अनेकदा चव्हाट्यावर आले आहेत. असे असताना रविवारी (३० नोव्हेंबर) रात्री उशिरा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील नेते आणि सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयासह एकूण ४ ठिकाणी धाड पडल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे रविवारीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा पार पडली होती. त्यानंतर लगेचच ही कारवाई झाल्याने त्यामागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप आता करण्यात येत आहे.

फक्त शहाजीबापू पाटील यांच्याच कार्यालयावर नाही तर सांगोल्यातील इतर पाच पक्षांच्या कार्यालयावर निवडणूक आयोगाने पोलिसांच्या सहाय्याने धाडी टाकल्याचे समोर आले आहे. यामध्ये भाजप, शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शहर विकास आघाडीच्या कार्यालयावर धाड टाकल्याचे समोर आले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री पहिल्यांदा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील नेते शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर धाड टाकली. त्यानंतर त्यांचे सहकारी रफिक नादाब यांच्या घरावर एका टीमने छापा टाकला. रात्री १० वाजता सुरु झालेली ही छापेमारीची मोहीम सोमवारी (१डिसेंबर) पहाटे संपल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या सर्व धाडींमध्ये काय समोर आले का? याबाबत प्रशासनाने कोणतीही माहिती दिलेली नाही. पण, या छापेमारीमुळे आता अनेक सवाल उपस्थित होत आहेत.

सांगोल्यात शहाजीबापू एकाकी
सांगोला नगरपरिषद निवडणुकीत भाजपने शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांना एकाकी पाडत शेकापसह सर्व पक्षीय आघाडी करुन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. यानंतर स्वत: शहाजीबापू पाटील यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली होती. भाजपच्या या राजकीय खेळीने ते चांगलेच संतापले होते. भाजपने केलेली ही खेळी हिडीस, किळसवानी, दहशतवादी आणि एखाद्या अबलेवर केलेली बलात्कारी कृती असल्याचे सांगत पाटलांनी भाजपावर आसूड ओढत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली होती.

‘झाडी डोंगर हॉटेल’ गोड लागले : अंबादास दानवेंचा टोला
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते शहाजीबापू पाटील यांना टोला लगावला आहे. गुवाहाटीला जाताना ‘झाडी डोंगर हॉटेल’ गोड लागले. आता भाजप विरुद्ध ब्र शब्द उच्चरला की छाप्याची मालिका सुरू झाल्याचा टोला दानवेंनी यावेळी शहाजीबापू पाटलांना लगावला. तसेच, खाताना ऊस गोड लागला, आता तोच ऊस पेकाटात बसतो आहे. ओकेमध्ये आहे, असे म्हणावेच लागेल आता बापू, असे म्हणत दानवेंनी त्यांच्यावर टीका केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR