मुंबई : प्रतिनिधी
पावसाळी अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा आहे. अधिवेशनाच्या आजच्या दिवशी विरोधकांनी केलेल्या अनोख्या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी आमदार निवासातील कॅन्टीन मॅनेजरला मारहाण केली होती. हा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला. या मुद्याचा निषेध करत विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पाय-यांवर प्रतीकात्मक टॉवेल-बनियान घालून सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत, हारून खान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे सतेज पाटील यांच्यासह इतर आमदारांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. या आमदारांनी पोस्टर झळकावले. त्यावर महाराष्ट्राची लूट करणा-या चड्डी-बनियन गँगचा धिक्कार असो असे छापले होते.
विरोधी पक्षाचे आमदार विधिमंडळाच्या पाय-यांवर सरकारविरोधात घोषणाबाजी करत होते तेव्हा मंत्री गिरीश महाजन आले. विरोधी आमदारांचा हा वेश पाहून हसत हसत ते विधान भवनात गेले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादाही तिथून आतमध्ये गेले. त्यांनाही हसू आवरले नाही.
शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीन मॅनेजरला मारहाण केली होती. जेवण निकृष्ट दिल्याचा आरोप करत आमदार गायकवाड यांनी बनियन आणि टॉवेलवर कॅन्टीनमध्ये येत कर्मचा-यांना जाब विचारला. ते इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी मॅनेजरला ठोसे, कानाखाली मारली. संजय गायकवाड यांचा हा व्हीडीओ समाज माध्यमात व्हायरल झाला आणि त्यामुळे सरकारची कोंडी करण्याची विरोधकांना आयती संधी सापडली.