लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर वाहतूक शाखेचे ट्राफिक पोलीस आता थेट यमदूत झालेत की काय?, असा सवाल लातूरकरांना पडला आहे. केवळ दंड वसुलीसाठी दुचाकीचालकाच्या जीवाशी खेळ करणा-या ट्रॅफिक पोलीसाच्या कृत्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. ट्राफिक पोलिसाच्या या कृतीमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
शहरात ट्राफिक नियमांची अंमलबजावणी करताना एका ट्राफिक पोलिसाने भर रस्त्यात वाहन अडवण्याचा प्रयत्न केल्याने दुचाकीस्वाराचा गंभीर अपघात झाल्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसलळी आहे. व्हायरल व्हीडीओमध्ये दिसणा-या दृश्यांनुसार, संबंधित ट्राफिक पोलिस वाहन थांबवण्यासाठी अचानक रस्त्यावर धावत जातो. या गोंधळात दुचाकीस्वाराचा तोल जातो. वाहन घसरते आणि दुचाकीस्वाराचे डोके थेट रस्त्याच्या डिव्हायडरवर आदळल्याचे दिसत आहे. काही क्षणांसाठी परिसरात एकच खळबळ उडाल्याचे चित्र व्हीडीओमध्ये पहावयास मिळत आहे. मात्र, या संपूर्ण प्रकारामागे नेमके कारण काय होते याबाबत अद्याप स्पष्टता नाही. संबंधित वाहनचालक गुन्हेगार होता का?, त्याच्यावर कोणता गंभीर गुन्हा दाखल होता का?, तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता का?, की केवळ वाहतूक नियमभंगाच्या कारवाईसाठी हा जीवघेणा पाठलाग करण्यात आला?, असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.
शहरात जिथे ट्राफिक असते तिथे ट्राफिक पोलिस कधीच नसतात. मात्र, सिग्नलला ट्राफिक पोलिस फक्त सावज हेरण्याचे काम करतात, शेतकरी, विद्यार्थी यांना टार्गेट करून चिरीमिरी घेण्यासाठी चक्क वाहनाच्या समोर येऊन एकाला अडविण्याचा प्रयत्न झाला. तो दुचाकीस्वार रस्ता दुभाजकाला धडकून पडला. ट्राफिक पोलिसामुळं चक्क अपघात झाल्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दंड वसुलीच्या नादात एखाद्याच्या जीवाशी खेळणे कितपत योग्य आहे? अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न करणारे लातूरचे पोलिस अधीक्षक अपघात घडविणा-या अशा ट्राफिक पोलिसांकडे लक्ष देतील का?, असा प्रश्न आता लातूरकर विचारत आहेत.
पोलिस अधीक्षक प्रकरणाची दखल घेतील का?
व्हायरल व्हीडीओतील वास्तव काय आहे? संबंधित पोलीस कर्मचा-याची भूमिका काय होती आणि अशा प्रकारच्या कारवायांसाठी कोणते मार्गदर्शक नियम आहेत? याबाबत प्रशासनाने तातडीने स्पष्टीकरण देणे आवश्यक असल्याची भावना लातूरच्या नागरिकांकडून व्यक्त होत आहे. यामुळे पोलिस अधीक्षक अमोल तांबे या प्रकरणाची दखल घेतील का? असा प्रश्न विचारला जात आहे.
















