देवणी : प्रतिनिधी
ग्रामीण भागातील तरुणांच्या हाताला काम मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच डी.एड, बी.एड शिक्षकांचे तटपुंज्या मानधनावर काम करत आहेत. त्यामुळे अनेक तरुण रोजगारासाठी शहराकडे स्थलांतर करीत असल्याचे पहावयास मिळत आहे. तथापि नोकरीची संधी नसल्याने त्यांच्या पदरी निराशाच असल्याची स्थिती आहे. ग्रामीण भागात व्यवसायाला वाव नाही. तसेच पैशाची चणचण आणि बँकांकडून कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने इच्छा असूनही अनेक तरुणांना व्यवसाय करता येत नाही. यामुळे बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. रोजगार देण्याचे कोणतेही कार्यक्रम आजपर्यंत कोणत्याही शासनाकडून हाती घेण्यात आलेले नाही.
पदवी घेऊन बाहेर पडलेले युवकांना भविष्यासाठी स्वत:च्या पायावर उभे राहायचे असते, त्यासाठी प्रथम त्याला रोजगार हवा असतो मात्र पदवी घेऊन बाहेर पडल्यानंतर कुठेही त्याला रोजगाराची संधी दिसत नाही. त्यामुळे उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्याने, त्यांनी पदवी घेतल्यानंतर देखील त्यांना आई-वडिलावर अवलंबून राहावे लागत आहे. यामुळे तरुणांमध्ये नैराश्याचे वातावरण आहे. त्यामुळे अनेक तरुणांचे मानसिक संतुलन बिघडून अनेक तरुण व्यसनाच्या आहारी जाताना ग्रामीण भागात दिसून येत आहेत. अनेक डी.एड, आणि बी.एड झालेले शिक्षक तटपुंज्या मानधनावर काम करीत आहेत.
अनेक कंपन्यांतील रोजगारांची संख्या झाली कमी
अनेक कंपन्यांनी त्यांच्याकडील मनुष्यबळ कमी केले आहे. कमीत कमी मनुष्य बळावर बारा तास काम करून घेतले जात आहे. त्यामुळे कंपनीतही प्रत्येकांना काम मिळेल हे सांगणे कठीण झाले आहे. परिणामी रोजगाराच्या शोधात बाहेर पडलेल्या तरुणांना शहरात हाती पडेल ते काम करून रोजगार मिळवावा लागत आहे. अनेक तरुण पदव्या घेऊन बाहेर पडत आहेत. ही संख्या मोठी आहे मात्र त्या तुलनेत रोजगार नसल्याने तरुणांची फरफट होत असल्याचे मुलांचे म्हणणे आहे.
















