लातूर : प्रतिनिधी
शहरातील छत्रपती राजर्षी शाहू महाराज चौकातील ‘त्या’ मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात आणखी एका ३८ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. डॉक्टराच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप संतप्त नातेवाईकांनी केला असून संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
येथील बु्-हाणनगरमधील ३८ वर्षीय महिला ‘त्या’ रुग्णालयात गर्भाशयाच्या आजारावर उपचारासाठी गेली होती. उपचारादरम्यान काही तासांतच त्या महिलेचा मृत्यू झाला. सदर दुर्घटना मृत महिलेच्या नातेवाईकांना कळताच नातेवाईकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. रुग्णालयाबाहेर नातेवाईक मोठ्या संख्येने जमा झाले. डॉक्टराच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून डॉक्टरवर गुन्हा दाखल करावा, यासाठी नातेवाईक आक्रमक झाले होते.

