लातूर : प्रतिनिधी
दिव्यांगांप्रती सन्मान आवश्यक आहे. दिव्यांगासाठी आता स्वतंत्र विभागाची स्थापना झाली असल्याने त्यांना मिळणा-या विविध योजनांचा लाभ सुलभ होण्यास मदत झाली असून जिल्हा प्रशासन दिव्यांगांना सक्षम बनविण्यासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी मंगळवारी केले.
जिल्हा प्रशासन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात झालेल्या दिव्यांगांप्रती संवेदनशीलता व जाणीव जागृती जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, केंद्रीय सल्लागार मंडळाचे सदस्य सुरेश पाटील, जिल्हा न्यायालयाचे ज्येष्ठ विधीज्ञ श्रीराम देशपांडे, डॉ. राजेश पाटील, डॉ. योगेश निटुरकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
दिव्यांगांप्रती संवेदनशीलता व जाणीव जागृती या कार्यशाळेतून सामाजिक व न्यायिक चर्चा होणार असून यामुळे मोठे बदल होतील. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ हा दिव्यांगांसाठी महत्वाचा असून यामुळे त्यांना समाजात सन्मानाची वागणूक मिळेल. प्रशासनही विविध योजनांच्या माध्यमातून दिव्यांगांना आधार देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी सांगितले.
प्रास्ताविकात जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांनी या कार्यशाळेच्या माध्यमातून दिव्यांगांच्या विविध कायद्यांची माहिती अधिकारी, कर्मचा-यांना होईल असे सांगून विविध १० फॅक्टर, दिव्यांगांसाठी पार्किंग, रॅम्प, भरती प्रक्रिया व निधी खर्चाची माहिती दिली. सूत्रसंचालन व्यंकट लामजने यांनी केले तर आभार वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता डॉ. राजु गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक सल्लागार बाळासाहेब वाकडे, अण्णासाहेब कदम, जयश्री कुलकर्णी, नरसिंग बिरादार, विजय बुरांडे, शिवप्रसाद भंडारे, श्रीकृष्ण लाटे, गणेश पाटील, बालाजी बनसोडे, राजकुमार पवार, ज्ञानेश्वर राव, श्रीकांत उंबरे, गजानन बन, यांच्यासह जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयातील व दिव्यांग शाळांतील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यशाळेस जिल्हयातील विविध विभागातील अधिकारी कर्मचा-यांसह दिव्यांग शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांची मोठया संख्येने उपस्थिती होती. या कार्यशाळेत जिल्हयातील ४३० जणांनी सहभाग नोंदविला. अॅड. श्रीराम देशपांडे, डॉ. योगेश निटुरकर, सतीश भापकर, सुरज बाजुळगे व्यंकट लामजने, विठ्ठल गाडेकर, संतोषकुमार नाईकवाडी यांनी मार्गदर्शन केले.

