लातूर : प्रतिनिधी
येथील जुन्या एमआयडीसीतील सुमित कोचेटा यांच्या स्क्रॅप मर्चंटला दि. ८ जुन रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली होती. पत्र्यांच्या २ ते ३ मोठ्या गोडाऊनमधील कागद, पुठ्ठा आणि इतर स्क्रॅप जळून खाक झाले असून ही आग दुस-या दिवशीही धुमसतच होती. त्यामुळे मंगळवारी दिवसभर अग्निशमनदलाला कुलिंगचे काम करावे लागले. त्यासाठीही मोठी यंत्रणा राबत होती.
जुन्या एमआयडीसीत सुमित कोचेटा यांच्या मालकीचे मोठे स्क्रॅप मर्चंट आहे. पत्र्यांच्या २ ते ३ मोठ्या गोडाऊनमध्ये रद्दी पेपर, कागद, पुठ्ठा मोठ्या प्रमाणात होता. या स्क्रॅपवर रिसायकलिंग केली जात असे. या स्क्रॅप मर्चंटला सोमवारी रात्री आग लागली. काही क्षणात आगीने रौद्ररुप धारण केले होते. आग एवढी भीषण होती की, ती आटोक्यात आणण्यासाठी खुप मोठी यंत्रणा लागली. लातूर शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे ३० जवानांना ८ बंबाद्वारे दुस-या दिवशी म्हणजेच मंगळवारी सकाळपर्यंत प्रयत्न करावे लागले.
भंगार साहित्य खरेदी करुन मोठ्या प्रमाणात स्क्रॅप मर्चंटमध्ये ठेवण्यात आले होते. अचानक लागलेल्या आगीत हे साहित्य खाक झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली?, याची माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे प्रमुख बापुसाहेब जाधव व त्यांचे जवान तातडीने घटना स्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग अटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु केले. सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास लागलेली आग मंगळवारी सकाळी ८ वाजता आटोक्यात आली. आग आटोक्यात आणण्यासाठी १० तास शर्तीचे प्रत्यत्न करावे लागले. दूस-या दिवशी दिवसभर कुलिंगचे काम करावे लागले.
४ वाहने, १ ट्रॅक्टर, मशिन्स जळून खाक
स्क्रॅप मर्चंटला लागलेल्या आगीत कागद, पुठ्ठा आणि इतर स्क्रॅप जळून खाक झाले त्यासोबतच चार वाहने, एक ट्रॅक्टर, मशीनस् जळून खाक झाले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही आणि पंचनामा झाल्यानंतरच किती नूकसान झाले हे समोर येईल, अशी माहिती लातूर शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे अधिकारी बापुसाहेब जाधव यांनी दिली.
















