अर्धापूर : प्रतिनिधी
तालुक्यातील देशमुखवाडी येथे अचानक चक्रीवादळ होवून गांवक-यांच्या घराची पडझड व शेतक-यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर पत्र्यांवर वजनासाठी ठेवलेले दगड अंगावर पडल्यामुळे काहींना किरकोळ दखापत झाली, मात्र जीव बचावला. या नैसर्गिक आपत्तीने शेतकरी उघडयावर आला आहे.
अर्धापूर तालुक्यातील देशमुखवाडी परिसरात शुक्रवारी दिवसभर उन्हाचा कडाका होता. जीवाची घालमेल सुरू असतांनाच सायंकाळच्या सुमारास अचानक आभाळ भरून आले आणि गावात चक्रीवादळ धडकले होते.
या नैसर्गिक आपत्तीत शेतक-यांच्या शेतातील केळीच्या बागासह ज्वारीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तर देशमुखवाडी गावातील तब्बल १० ते १५ घरांवरील पत्रे उडून गेले, कांही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे अनेक कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. तर उडालेल्या पत्र्यांवर वजनासाठी ठेवलेले दगड अंगावर पडल्यामुळे काहींना किरकोळ दखापत झाली आहे. तसेच या वादळात काही जनावरांनाही दुखापत झाली आहे.
















