वडीगोद्री : प्रतिनिधी
गोरगरिबांच्या दारात हे आले पाहिजेत, आपण नाही जायचं. मराठा समाजाला आवाहन आहे की दरेकरांच्या अभियानात सहभागी होऊ नका, त्यांचा दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आमदार प्रवीण दरेकर यांनी रात्री माहीम, अंधेरी पूर्व, मलबार हिलला देखील बैठक घेतली. दोन-तीन दिवस थांबा मोठा पर्दाफाश होणार, असे सूचक वक्तव्य मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज केले. ते अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
जरांगे पुढे म्हणाले, माझी निष्ठा तुम्ही विकत घेऊ शकत नाही. मी तुम्हाला मॅनेज होऊ शकत नाही. मराठ्यांचे आंदोलन चिघळवण्याचा डाव दिसत आहे. फडणवीस साहेब, आम्ही तुम्हाला आणखी शत्रू आणि विरोधक मानले नाही. तुम्ही समजून घ्या, दरेकरचे ऐकून डाव खेळू नका, असा इशारा जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
विद्यार्थ्यांना ईएसबीसी, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस तिन्ही आरक्षण ठेवावे. खोटी आश्वासनं देऊन मुलीबाळींना फसवू नका. मुलींना मोफत शिक्षणासाठीच्या अटी-शर्थी रद्द करा. हे सगळे विषय थोड्यावेळापूर्वी मंत्री शंभुराज देसाई यांना सांगितले असल्याचे जरांगे म्हणाले. तसेच सरकारने शिंदे समितीला मुदतवाढ दिली त्याबद्दल समाजाच्या वतीने आभार, त्यांचे कौतुक आहे. मात्र, मुदतवाढ देऊन काम होत नाही. त्यांना काम करायला लावा, नुसती मुदतवाढ देऊन काही अर्थ नाही, असेही जरांगे म्हणाले.