16.2 C
Latur
Tuesday, December 2, 2025
Homeलातूरनिवडणूक आयोगाची कृती लोकशाहीविरोधी

निवडणूक आयोगाची कृती लोकशाहीविरोधी

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील निलंगा नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानाला अवघे १२ ते १४ तास शिल्लक असताना या निवडणुकीला स्थगिती देण्याचा निर्णय अनाकलनीय आणि धक्कादायक आहे. निवडणूक आयोगाची ही कृती जनतेच्या मतदान अधिकारावर गदा आणणारी आणि लोकशाहीविरोधी आहे, अशी तीव्र शब्दात टीका राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केली आहे.
माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबवण्याच्या प्रवृत्तीवर कडक शब्दांत ताशेरे ओढले ते म्हणाले, निवडणुका लांबवण्याचे षडयंत्र असून राज्यातील सत्ताधारी मंडळींना प्रशासनाच्या माध्यमातून एकाधिकारशाही गाजवता यावी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका या ना त्या कारणाने लांबवण्याचा प्रयत्न होत आहे.
ही कृती म्हणजे पंचायतराज कायद्याचे उल्लंघन असून पंचायतराज कायद्यानुसार दर पाच वर्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे आवश्यक आहे, मात्र तांत्रिक कारणावरून या निवडणुका पुढे जातील याची व्यवस्था राज्यातील सत्ताधारी मंडळींकडूनच केली जात आहे, असे त्यांनी म्हटले आहे. अंतिम क्षणी निवडणुकांना स्थगिती देणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणुका जाहीर झाल्यावरही त्या सुरळीत पार पडणार नाहीत याची सत्ताधारी मंडळीकडून व्यवस्थाच आयोगामार्फतच केली जात आहे, असे दिसुन येते.  लातूर जिल्ह्यातील रेणापूर नगर पंचायतसह राज्यातील २२ नगर परिषद, नगर पंचायतीच्या निवडणुका प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना शेवटच्या दिवशी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला, यात निलंगा नगर परिषद निवडणुकीची स्थगिती सर्वात भयानक आहे, असे माजी मंत्री, आमदार अमित देशमुख म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR