मुंबई : प्रतिनिधी
मतदानाच्या केवळ एक दिवस आधीच पुढे निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे २४ नगराध्यक्ष आणि २०४ नगरपालिका सदस्यांची निवडणूक लांबणीवर गेल्या आहेत. त्यामुळे उमेदवार आणि मतदारांमध्ये मोठी निराशा पसरली आहे. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक सत्ताधारी नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर विरोधकांनीदेखील निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. माझ्या राजकीय जीवनात इतका गोंधळलेला निवडणूक आयोग मी कधीही पाहिलेला नाही, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, आधीचे निवडणूक आयोग स्वायत्तपणे काम करत असे. पण, आता आयोग सरकारच्या दिशेनुसार निर्णय घेत असल्याचे चित्र आहे. निवडणुका एक दिवस आधी पुढे ढकलणे, काही ठिकाणी प्रक्रिया थांबवणे, तर काही ठिकाणी जुन्या याद्यांवरून मतदानाची तयारी ठेवणे, या कृतींमुळे लोकांचा आयोगावरचा विश्वास ढासळत चालला आहे असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेला कार्यक्रम चुकीचा, विस्कळीत आणि संशयास्पद आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाबाबत दिलेल्या स्पष्ट निर्देशांकडे आयोग दुर्लक्ष कसे करू शकतो? निवडणुका अचानक रद्द करणे किंवा पुढे ढकलणे याचा गंभीर परिणाम जनतेवर होतो. याचा विचार आयोग करत नाही. अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
निवडणूक आयोग स्वत: निर्णय घेणार की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सांगतील तसे वेळापत्रक जाहीर करणार? प्रत्येक वेळी सत्ताधा-याच्या इशा-यावर कार्यक्रम बदलला जाणार असेल तर आयोगाचे अस्तित्वच शंकेखाली येते, असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला आहे.
निवडणुकांआधीच मतदार याद्यांमधील घोळ, काही ठिकाणी चुकीचे प्रभाग वर्गीकरण, काही भागात हजारो मतदार एका वॉर्डातून दुस-यात टाकणे, अशा सर्व विसंगती आयोगाच्या नियोजनशक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात. लोकशाहीतील सर्वात महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे मतदान तसेच त्यातच गैरव्यवहार दिसला तर भविष्यात जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास डळमळीत होऊ शकतो अशी चिंता व्यक्त केली आहे.
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय जनतेच्या हक्कावर गदा आणणारा आहे. लोकांनी उमेदवारांवर विश्वास ठेवून त्यांना साथ दिली. प्रचारामध्ये सर्व शक्ती खर्च केल्या, पण मतदानाच्या आदल्या दिवशी निवडणूक रद्द केली. तर उमेदवारांचे आणि मतदारांचे काय? जनतेचे मत व्यक्त करण्याचा अधिकार हिरावणे म्हणजे लोकशाहीला धक्का,’’ असे म्हणत त्यांनी टीका केली. ‘चुकीची वेळापत्रक आखून नंतर चुका जनतेच्या माथी मारणे हे अत्यंत गैरकृत्य आहे. तसेच जबाबदार अधिका-यांवर कारवाई करण्यात यावी,’’ अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

