भारतीय वन सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार मे महिन्यामध्ये जंगलांमध्ये आगी लागण्याच्या ३४२ घटना देशभरात घडल्या. याचा मोठ्या प्रमाणावर फटका पक्ष्यांना बसला आहे. याचे कारण मार्च ते जून हा काळ पक्ष्यांचा प्रजननाचा काळ असतो. गेल्या काही वर्षांत वाढत चाललेल्या तापमानामुळे पक्ष्यांचे जीवनमान बदलते आहे.
पृथ्वीवरील सर्व जीवांचा विकास आणि जीवनचक्र एकमेकांच्या संरक्षणावर आधारित आहे. आद्यकवी वाल्मिकी यांनी क्रौंच पक्ष्याच्या जोडीतील एकास बाण मारल्यानंतर दुस-याने त्यांना दिलेला अभिशापसुद्धा जिओ और जीने दो, ही भारतीय संस्कृती अधोरेखित करणारा आहे. हा संदेश जपणे आजही तितकेच किंबहुना त्या पेक्षाही अधिक आवश्यक बनले आहे. पशुपक्ष्यांच्या नैसर्गिक दिनचर्येमुळे मानवाच्या नीरस जीवनात प्रसन्नता आणि प्रफुल्लता निर्माण होते. निसर्ग आपल्याला सहअस्तित्वाचा धडा नेहमी शिकवीत असतो. विशेषत: पक्षी मानवी जीवनासाठी नेहमीच सा भूत ठरल्याचे दिसते. कृषिप्रधान भारताच्या पर्यावरणाचे संतुलन राखण्यात पक्ष्यांची भूमिका मोलाची ठरली आहे. भारतातील जलवायू आणि भौगोलिक परिस्थिती अनुकूल असल्यामुळेच भारताला पक्ष्यांचा स्वर्ग मानले गेले आहे. मोर, तीतर, बटेर, कावळा, शिकरा, ससाणा, काळी चिमणी आणि गिधाडासारखे पक्षी शेतक-यांसाठी वरदान आहेत. दुसरीकडे देशात सातासमुद्रापलीकडून येणा-या परदेशी पाहुण्या पक्ष्यांनीही एक परंपरा पाळलेली दिसते; पण सध्या याबाबत चिंताजनक स्थिती दिसून येत आहे.
भारतीय वन सर्वेक्षण विभागाने १२ मे रोजी एका दिलेल्या माहितीनुसार, देशात एकाच आठवड्यात जंगलात वणवा पेटण्याच्या ३४२ घटना घडल्या असून यातील २०९ घटना एकट्या उत्तराखंडच्या आहेत. अर्थात जंगलातील आगी या मानवाच्या निष्काळजीपणामुळेच लागलेल्या आहेत आणि यात कोणाचेही दुमत नाही. शुष्क जमीन आणि सामान्यापेक्षा अधिक तापमान असते तेव्हा निष्पर्ण जंगलात अशा आगी धुमसत राहतात. दुसरीकडे मार्च ते जूनपर्यंतचा काळ हा पक्ष्यांच्या उच्च प्रजननचा काळ असतो. अशाच वेळी जंगलात आग लागत असेल तर साहजिकच पक्ष्यांच्या प्रजनन क्षमतेवर आणि प्रक्रियेवर परिणाम होणे स्वाभाविक आहे. जंगलातील आगीमुळे वनसंपदा नष्ट होतेच त्याच बरोबर अनेक लहान मोठ्या जीवांनाही त्याचा फटका बसतो. अशा परिस्थितीच्या स्थानिक अर्थव्यवस्थेवर संभाव्य परिणामाचे आकलन करणे कठीण जाते.
निसर्गाचे संतुलन आणि जीवनचक्र यामध्ये स्थलांतरित पक्ष्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. जीवनाची आशा घेऊन येणा-या पक्ष्यांच्या मागील अनेक पिढ्या दरवर्षी स्थलांतर करीत आहेत. शेकडो वर्षापासून हे हंगामी स्थलांतर सुरू आहे. आर्क्टिक क्षेत्र आणि उत्तर ध्रुवावर जेव्हा तापमान शून्याच्या खाली ४० अंशांपर्यंत उतरण्यास प्रारंभ होतो तेव्हा तेथील पक्षी भारताकडे स्थलांतर करतात. हजारो वर्षांपासून सुरू असलेले हे स्थलांतर सर्वांनाच ठाऊक आहे. हे पक्षी रस्ता कसा शोधतात? हजारो किलो मीटर प्रवासाचा हा रस्ता त्यांच्या लक्षात कसा राहतो? ज्या ठिकाणी त्यांचे आजोबा-पणजोबा आले त्याच नेमक्या ठिकाणी तेही कसे येतात? या प्रश्नांची उकल अजून विज्ञानालाही झालेली नाही. एका पिढीतून दुस-या पिढीत गुणसूत्रे, जनुके स्थानांतरित होत असताना वर्षभर आहार मिळावा यासाठी पक्ष्यांच्या प्रजाती खडतर प्रवास करीत असतात. अर्थात पक्ष्यांचे स्थलांतर इतक्यात थांबणार नाही; पण एका अहवालानुसार, आपल्या प्रजनन काळात काही पक्षी स्वत:ची जागा सोडत नसल्याचे दिसून आले आहे. आपण दिल्लीच्या ओखला पक्षी अभयारण्यात फेरफटका मारल्यास आर्क्टिक क्षेत्रातून येणा-या अनेक पक्ष्यांची यंदा गैरहजेरी जाणवेल.
साहजिकच स्थलांतरित पक्षी अणि त्यांचा आहाराचा स्रोत यात ताळमेळ बसत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी पक्ष्यांची संख्या कमी होऊ शकते किंवा अचानक वाढू शकते. याचा परिणाम म्हणजे अनेक प्रकारचा आहार करणा-या आणि सर्वच ऋतूत अनुकूल राहणा-या प्रजातींची संख्या वाढत असून दुसरीकडे विशिष्ट वातावरणात राहणा-या पक्ष्यांची संख्या मात्र कमी होताना दिसत आहे. याचे उदाहरण म्हणजे कोकिळा. कोकिळेचा वावर टोल प्लाझा आणि रेल्वे स्थानकांवर अधिक प्रमाणात दिसतो. कारण त्यांचा नैसर्गिक अधिवास सिमेंटच्या डोंगरांमध्ये आणि विकास प्रकल्पांच्या नावाखाली केल्या गेलेल्या झाडांच्या कत्तलीमुळे हिरावला गेला आहे. पक्ष्यांवर लक्ष ठेवणा-या उपकरणांनी शास्रज्ञांना जगभरातील पक्ष्यांचे स्थलांतर आणि स्वभावातील बदल जाणून घेण्याची व्यापक संधी उपलब्ध करून दिली आहे. पक्षी हे कोणत्या मार्गाने आणि कशा रितीने उत्तरेकडून दक्षिणेकडे जातात, याचे आकलन याद्वारे केले जाते. एका आकडेवारीनुसार,
भारतीय उपखंडात हिवाळ्यात ६०० पेक्षा अधिक स्थलांतरित पक्ष्यांचा अधिवास होतो मात्र अलीकडील काळात यापैकी २४० प्रजातींची संख्या घटलेली दिसते. अर्थात परदेशी पाहुणे पट्टकदंब हंस (बार हेडेड) च्या बाबतीत स्थिती समाधानकारक आहे. भारताचे वातावरण हे परदेशी पाहुण्यांना विविध प्रकारची स्थिती उपलब्ध करून देते मात्र या अधिवासावर विकास योजनांचा हातोडा बसत आहे. केवळ वातावरणातील बदलामुळेच नाही तर वाढत्या तापमानामुळे देखील पक्ष्यांचा अधिवास संपुष्टात आणला जात आहे. अशा वेळी कोकिळा किंवा पट्टकदंब हंस पक्ष्यांप्रमाणे अन्य प्रजातीदेखील नव्या वातावरणाशी अनुरुप ठरतात की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. पूर्व आणि भारतीय उपखंडात एप्रिल महिन्यात सामान्यापेक्षा वाढलेले तापमान हे हवामान बदलाचे गांभीर्य सांगणारे आहे; परंतु केवळ आपल्या अस्तित्वापोटीच हवामान बदलावर चर्चा करायला हवी का नाही? आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करणा-या सर्व जीवजंतूंशी आपण जोडलो गेलेलो आहोत. अशा वेळी स्वत:इतकेच त्यांच्या प्रतीही तेवढेच संवेदनशील राहावे लागेल.
एके काळी पक्ष्यांच्या बाबतीत आपला देश प्रचंड संपन्न होता; परंतु आजकाल आपल्याकडे पक्ष्यांच्या असंख्य प्रजाती सातत्याने लुप्त होत चालल्या आहेत. जागतिक तापमानवाढीचे संकट आटोक्यात आणले नाही तर एक दिवस आपल्याला पक्ष्यांचा किलबिलाट केवळ आपल्या मोबाइल रिंगटोनमध्येच ऐकावा लागेल. परिस्थिती बिघडत चाललेली असताना आपण आपल्या भोवतालच्या थोड्या-फार पक्ष्यांचा जीव तरी छोट्या-छोट्या प्रयत्नांमधून वाचवू शकतो. वाढत चाललेल्या तापमानाने पक्ष्यांना भीषण उष्म्यापासून बचावाचे असे उपाय शिकवले आहेत. ज्या काळात शहरांच्या अवतीभवती गच्च झाडी असे, या झाडांना भरपूर फळे लगडत असत, प्रदूषणाचे प्रमाण आता आहे तितके नव्हते. त्या वेळी पक्ष्यांना कोणत्याही हंगामात अशा प्रकारच्या उपाययोजनांची गरज भासत नव्हती. त्या वेळी पक्षी एका झाडावरून दुस-या झाडावर बागडताना केवळ उन्हाळा आणि थंडीपासूनच स्वत:चा बचाव करीत होते असे नव्हे तर आपल्या किलबिलाटाने इतरांच्या मनातही आशेची पालवी निर्माण करीत होते; परंतु आधुनिक जीवनशैली आणि विकासाच्या वादळाने केवळ माणसासमोरच नव्हे तर या पृथ्वीवर राहणा-या सर्व प्राण्या-पक्ष्यांसमोर, कृमिकिटकांसमोर प्रचंड संकटे निर्माण केली आहेत. वास्तविक विकासाच्या शर्यतीत माणसाने स्वत:च्या अस्तित्वाचीही फिकर केली नाही आणि इतरांच्याही! याच कारणामुळे केवळ माणसेच नव्हे तर अन्य जीवही त्रस्त होत आहेत.
-रंगनाथ कोकणे, पर्यावरण अभ्यासक