लातूर : प्रतिनिधी
ग्रामीण विकास व पंचायतराज यंत्रणेला मजबूत करण्याच्या उद्दिष्टाने राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५ अंतर्गत लातूर तालुक्यातील ग्रामसंसद भवन सिकंदरपूर येथे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनानुसार लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व ग्रामसंसद सिकंदरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फिरते न्यायालय-मोबाईल व्हॅन उपक्रमात ग्रामस्थांना कायदेविषयक माहिती व जनजागरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमामुळे दुर्गम भागातील गावक-यांना न्यायिक सेवा सहज उपलब्ध होईल आणि अभियानाचे उद्दिष्ट साध्य होईल, असे आयोजकांनी सांगितले.
यावेळी विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायमूर्ती व्ही. एन. गिरवलकर यांनी गोर गरीबांसाठी उपलब्ध असलेल्या योजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन करत या उपक्रमांद्वारे ग्रामपंचायतींना सक्षम करणे हे उद्दिष्ट असून अशा मोबाईल व्हॅनद्वारे दरमहा १० गावांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन आहे. यामुळे शेवटच्या घटकापर्यंत न्याय मिळेल. सरपंच प्रा. रेशमा माधव गंभीरे ग्रामस्थांना कायद्याची जागरूकता वाढवण्याचे आवाहन केले. यशदा प्रवीण प्रशिक्षक माधवराव गंभीरे यांनी प्रस्ताविकात ग्रामसभा स्तरावर अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली. अँड. गुरुसिद्ध मिटकरी यांनी जमीन विवाद व आरटीआय प्रक्रियेवर विशेष चर्चा केली. तर सोमवंशी यांनी महिला व बालकल्याण कायद्यांवर सल्ला दिला. तिवारी, मिटकरी, शेळके, गायकवाड यांनी ही ग्रामस्थांसोबत थेट चर्चा केली आणि वैयक्तिक समस्या सोडवण्यासाठी मदत जाहीर केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मुख्याध्यापक तळभोगे यांनी केले. आभार ग्रामपंचायत अधिकारी कलबूने के. बी. यांनी मानले.

