पाटणा : वृत्तसंस्था
बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण प्रक्रियेत राज्यातील ९०.१२ टक्के मतदारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. मात्र, यामध्ये ३६.८६ लाख मतदार गहाळ, मृत किंवा कायमस्वरूपी स्थलांतरित असल्याचेही आढळले आहे.
या विशेष पुनरिक्षणाची सुरुवात २५ जून रोजी झाली होती. आयोगाने २४ जून रोजी आदेश जारी केल्यानंतर लगेचच बिहारमध्ये ही प्रक्रिया सुरू झाली. राज्यातील सुमारे ७.८ कोटी नोंदणीकृत मतदारांना मतदार यादीत नावाची पुष्टी करण्यासाठी फॉर्म भरून देण्याचे आवाहन करण्यात आले होते.
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार आतापर्यंत ७.११ कोटी अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ६.८५ कोटी अर्ज डिजिटल स्वरूपात प्रक्रियेत आणण्यात आले आहेत.
त्यात ३६.८६ लाख मतदार (सुमारे ४.६७ टक्के) मृत, स्थलांतरित किंवा एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंदणीकृत असल्याचे दिसून आले आहे. तसेच ६९७८ मतदार (०.०१ टक्के) ‘शोधता न येणारे’ असल्याचेही नोंदवले गेले आहे.