राज्यात सर्वत्र मान्सून व्यापणार, हवामान खात्याचा अंदाज
मुंबई : प्रतिनिधी
उकाडा, आणि घामाच्या धारांनी त्रस्त झालेल्या नागरिकांना आता हवामानात मोठा बदल अनुभवायला मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील तब्बल ३० जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला असून पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागांत वादळी वा-यांसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबई, पुणे, ठाणे आणि कोकणासह राज्याच्या विविध भागांत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला.
हवामान विभागाने राज्यातील ३० जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, बीड, परभणी, लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा यात समावेश आहे. या भागांमध्ये काही ठिकाणी ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत हलक्या सरी कोसळू शकतात. मात्र, पाऊस पडूनही विदर्भ आणि खान्देशातील उष्णतेत फारसा दिलासा मिळण्याची शक्यता नाही.
चार दिवस पावसाची शक्यता
पावसाचा हा प्रभाव दि. १० ते १३ जूनदरम्यान असणार आहे. मुंबई, ठाणे आणि पुणे परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची मालिका कायम राहू शकते. सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत मान्सून अधिक सक्रिय होण्याची शक्यता असून, काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
१२ ते १८ जूनदरम्यान
मराठवाड्यात हजेरी
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे हवामानशास्त्र विभाग प्रमुख डॉ. कैलास डाखोरे यांनी सांगितले की, सध्या मराठवाड्यातील वातावरणामुळे मान्सूनच्या प्रगतीवर काही प्रमाणात परिणाम होत आहे. मात्र, १२ ते १८ जूनदरम्यान मान्सून संपूर्ण मराठवाडा व्यापण्याची शक्यता आहे.
















