लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिका, नंदनवन नागरी बेघर निवा-यास मनपा आयुक्त श्रीमती मानसी यांनी शुक्रवारी दि. १८ जुलै रोजी भेट देऊन पाहणी करून सूचना केल्या. निवा-यामध्ये वास्तव्यास असणा-या लाभार्थ्यांना देण्यात येणा-या सोयी सुविधांची माहिती घेतली. तसेच येथे आणखीन काही आवश्यक सुविधा देण्याबाबत चर्चा केली.
लातूर शहर महानगरपालिका, केंद्र शासन पुरस्कृत, दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान नागरी बेघरांसाठी निवारा घटका अंतर्गत शहरातील बेघर नागरिकांसाठी बस स्थानक, रेल्वे स्टेशन, फुटपाथ, सार्वजनिक ठिकाणे, धार्मिक स्थळे, कारखाना व कंपनी परिसर, रस्त्याच्या कडेला, पुलाखाली, बांधकाम साईट, मंदिर, मस्जिद, अशा ठिकाणी आश्रय घेणारे वृद्ध, अपंग, भिकारी, बालके, महिला, आजारी व्यक्ती, निराश्रित व्यक्ती, बेवारस आणि ज्यांना पूर्णत: उघड्यावर आश्रय घ्यावा लागतो, अशा लोकांसाठी शहरातील ठाकरे चौक येथे ‘नंदनवन’ नागरी बेघर निवारा सुरु करण्यात आला आहे.
येथे बेघर बांधवांसाठी चहा, नाश्ता, जेवण, आरोग्य तपासणी, अशा सुविधा देण्यात येते. या निवा-यामध्ये पुरुष कक्ष, महिला कक्ष व दिव्यांग कक्ष, अशी वेगवेगळी राहण्याची सोय करण्यात आली आहे. सदरील निवारा हा सी. सी. टी. व्ही. च्या निगराणीखाली असून याचे देखभाल व सनियंत्रण सलात अल्पसंख्यांक बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. येथे वास्तव्यास असलेल्या बेघर बांधवांपैकी कोणी आजारी असेल तर त्यांना शासकीय रुग्णालयामध्ये मोफत वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिले जाते.
तरी शहरातील नागरिकांनी शहरामध्ये बेघर नागरिक आढळून आल्यास त्यांना ‘नंदनवन’ नागरी बेघर निवारा, ठाकरे चौक, मनपा शाळा क्र. ४ झोन कार्यालयाशेजारी विवेकानंद हॉस्पिटलच्या पाठीमागे किंवा ९०२८५९१७४५, ९९२३४५३६५७, ९८५०२०३२११ या नंबर वर संपर्क करावे जेणेकरून अशा बेघर नागरिकांना सुरक्षितपणे नागरी बेघर निवारा येथे आश्रय घेता येईल. असे आवाहन महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी यांनी केले आहे.