लातूर : प्रतिनिधी
शहरात वाहतूकीचे नियम मोडणा-यांना वाहतुक शाखेने चांगलाच दणका देत १ जानेवारी ते ३० जुन या दरम्यान तब्बल ४१ हजार २६२ वाहन धारकांवर कारवाई केली आहे. त्याच्याकडून १ कोटी ७२ लाख ७६ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यापुढेही कारवाई अशीच सुरू होणार असून नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश कदम यांनी केले आहे.
शहरात वाहतुकीचे नियम न पाळणे, सुसाट वेगाने वाहन चालविणे यासह सुरळीत वाहतुकीत अडथळा, ट्रिपल सीट, विना गणवेश अॅटोरिक्षा चालवणे, फॅन्शी नंबर प्लेट, कर्कश हॉर्न, अवैध्य प्रवासी वाहतूक अशा प्रकारच्या विविध ४१ हजार २६२ वाहनांवर शहर वाहतूक शाखेने सहा महिन्यात कारवाई केली आहे. शहरातील वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार गेल्या काही महिन्यांपासून वाढले आहेत. बेशिस्त वाहतुकीला आळा आणण्याचा प्रयत्न वाहतूक शाखेकडून होत असला तरीही वाहतुकीत काही प्रमाणात बेशिस्तच राहते.
वाहनधारकांनी स्वत: वाहतुकीचे नियम पाळल्यास बेशिस्त वाहतूक ब-यापैकी आटोक्यात येऊ शकते. नियमांना धाब्यावर बसविणा-या वाहनधारकांविरुद्ध शहर वाहतूक शाखेने १ जानेवारी ते ३० जुन २०२४ दरम्यान कारवाई केली आहे. यात ४१ हजार २६२ वाहनांनी नियम मोडल्याचे आढळून आल्याने वाहतूक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असून त्यातून १ कोटी ७२ लाख ७६ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.