लातूर : प्रतिनिधी
रयतेचे राजे आणि हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज, विश्वाच्या कल्याणासाठीचे पंचशील तत्वज्ञान देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध आणि मानव केंद्रबिंदू ठेवून खेड्यांच्या विकासातूनच राष्ट्र विकास होईल हा मूलमंत्र देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा आदर्श नव्या पिढीला प्रेरणादायी व्हावा तसेच यांचा आदर्श हाच मानवातील स्रेहभाव वृद्धिंगत करण्यासाठी उपयोगी पडेल हे जाणून विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी त्यांच्या मूर्तीची स्थापना रामेश्वर(रूई) येथे उभारण्यात आलेल्या ‘विश्वधर्मी मानवता तीर्थ भवनात’ केली.
विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे भारत व मानवता तीर्थ रामेश्वर (रूई) यांच्या संयुक्त विद्यमाने जगातील सर्वात मोठ्या आणि विस्तीर्ण दालन असलेल्या ‘विश्वधर्मी मानवता तीर्थ भवन’ या वास्तूमध्ये सत्य, शांती, अहिंसा, प्रेम आणि मानवतेचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या, मानवी इतिहासातील काही उत्तुंग व पथदर्शी व्यक्तिमत्वांच्या चैतन्यदायी प्रतिकांची या ठिकाणी प्रतिष्ठापना आणि पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन या वास्तूचे संकल्पक, संरचना, नियोजक व निर्मितीकार एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ कराड, प्रगतिशील शेतकरी हभप काशीराम कराड, ऋषिकेश कराड, माईर्स एमआयटीचे कुलसचिव डॉ. रत्नदीप जोशी, वरिष्ठ सल्लागार डॉ. संजय उपाध्ये, गिरीश दाते, संचालक डॉ. महेश थोरवे, दिलीप पाटील, विष्णू भिसे, सचिन मुंडे व योगेश पारखी उपस्थित होते.
यावेळी डॉ. जोशी म्हणाले, जगामध्ये विद्वेषाची भावना वाढीस लागत असताना व्यक्ती व्यक्तींमधील सहसंवाद आणि स्रेहभाव वृद्धिगंत व्हावा यासाठी रामेश्वर रूई येथे विश्वधर्मी मानवता तीर्थ भवनाची संकल्पना डॉ. विश्वनाथ कराड यांनी केली. त्याची निर्मिती हेच एक मोठे आद्भुत आश्चर्य आहे. ९० फूट रूंदीचा मधला सभागृहाचा भाग हा भारतातील एकमेव द्वितीय असून या सभागृहामध्ये शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक स्रेहभावाचे तसेच ग्रामीण जनतेची काळ्या मातीशी असलेली नाळ दिसून येते.

