18.2 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपने नेमले मतदारसंघाचे प्रभारी

भाजपने नेमले मतदारसंघाचे प्रभारी

शिरसाट यांच्या पश्चिमची जबाबदारी भुमरेंकडे

छ. संभाजीनगर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने राज्यातील ११३ विधानसभा मतदारसंघांत निवडणूक प्रभारी आणि विधानसभा निरीक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. मराठवाड्यातील शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार, तानाजी सावंत यांच्यासह बहुतांश आमदारांना आपापल्या मतदारसंघात निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

शिवसेनेचे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाट यांच्या मतदारसंघात मात्र छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे यांच्यावर प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या इतर मंत्री, आमदारांना आपापले मतदारसंघ प्रभारी म्हणून देण्यात आले असताना संजय शिरसाट यांच्या बाबतीत वेगळा निर्णय घेण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शिवसेना पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या सहीने ११३ विधानसभा मतदारसंघात ४६ निवडणूक प्रभारी तर ९३ विधानसभा निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. मराठवाड्यात राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणनमंत्री तथा संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे त्यांच्या स्वत:च्या सिल्लोड मतदारसंघासह कन्नडची अतिरिक्त जबाबदारी निवडणूक प्रभारी म्हणून देण्यात आली आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याकडे उमरगा आणि स्वत:चा परंडा मतदारसंघ प्रभारी म्हणून सोपवण्यात आला आहे. जालना आणि बीड विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री तथा शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर हे प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत. वैजापूरचे विद्यमान आमदार प्रा. रमेश बोरनारे यांच्याकडे वैजापूरसह शहरातील मध्य मतदारसंघाची जबाबदारी असेल.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार संदिपान भुमरे हे पैठण विधानसभा मतदारसंघासह संजय शिरसाट यांच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रभारी असतील. पश्चिम मतदारसंघाची जबाबदारी शिरसाट यांच्याऐवजी भुमरेंकडे दिल्याने वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या आहेत. संभाजीनगरच्या पालकमंत्रिपदावरून भुमरे-शिरसाट यांच्यात वाद झाल्याचे बोलले जाते.
भुमरे यांनी दोघांत तिसरा नको, अशी भूमिका घेत पालकमंत्रिपदासाठी अब्दुल सत्तार यांच्या नावाची शिफारस मुख्यमंत्र्यांकडे केली होती. तेव्हापासून शिरसाट-भुमरे यांच्यात फाटल्याचे बोलले जात होते. त्यात आता संजय शिरसाट यांच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रभारी म्हणून संदिपान भुमरे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आल्याने ही त्यांच्याविरोधात खेळी तर नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे.

याशिवाय हिंगोलीचे माजी खासदार हेमंत पाटील यांच्याकडे हदगाव, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण आणि मुखेड या चार विधानसभा मतदारसंघांचे प्रभारी पद सोपवण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हेमंत पाटील यांची हिंगोलीतून जाहीर झालेली उमेदवारी ऐनवेळी बदलण्यात आली होती.
त्यांच्याऐवजी पत्नीला वाशिममधून उमेदवारी देण्यात आली होती. पण राजश्री पाटील यांचा तिथे पराभव झाला. हेमंत पाटील यांचे पुनर्वसन कसे होणार? याची चिंता त्यांच्या समर्थकांना लागून आहे. तूर्तास विधानसभा निवडणुकीसाठी हेमंत पाटील यांना नांदेड जिल्ह्यातील चार मतदारसंघांची जबाबदारी देऊन बोळवण करण्यात आली आहे.

मराठवाड्यातील निवडणूक प्रभारी असे..
अब्दुल सत्तार – कन्नड, सिल्लोड
अर्जुन खोतकर- बीड, जालना
आनंद जाधव- घनसावंगी, पाथरी
तानाजी सावंत- उमरगा, परंडा
दीपक सावंत- देगलूर, लोहा
रमेश बोरनारे- वैजापूर, छत्रपती संभाजीनगर मध्य
मंगेश सातमकर- कळमनुरी, वसमत
संदिपान भुमरे- पैठण, छत्रपती संभाजीनगर पश्चिम
हेमंत पाटील- हदगाव, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, मुखेड

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR