लातूर : प्रतिनिधी
शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासमोर जलवाहिनी फुटली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी जलवाहिनी फुटलेली आहे. यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. परंतु, याकडे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दुर्लक्ष केलेले दिसून येत आहे. मध्यवर्ती बसस्थानकाच्या गेट क्रमांक २ च्या अगदी समोर सिमेंट क्रॉक्रीट रोडच्या खाली असलेली जलवाहिनी फुटली आहे. लातूर शहर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पाच दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो.
दर पाच दिवसाला मध्यवर्ती बसस्थानकाच्या परिसरात पाणीपुरवठा होताच या फुटलेल्या जलवाहिनीतून मोठ्याप्रमाणात पाणी वाया जात आहे. पाणी रस्त्यावर पसरल्याने त्याचा प्रवाशांना त्रास होत आहे. सिमेंट क्राँक्रीटच्या रस्त्यावर पाणी पसरल्याने दुचाकी वाहने घसरून अपघात होत आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने फुटलेली ही जलवाहिनी दुरुस्त करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
















