लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिका अंतर्गत कार्यरत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रेबीज प्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक श्रीमती मानसी यांनी दिले होते. त्यानुसार मनपा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रेबीज प्रतिबंधक लस उपलब्ध करण्यात आली आहे.
शहरातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र इंडियानगर, तावरजा कॉलनी, मंठाळेनगर, गौतमनगर व प्रकाशनगर येथील आरोग्य केंद्रामध्ये सदरील लस विनामूल्य उपलब्ध आहे. श्वानानी चावा घेतल्यानंतर रेबीज या रोगापासून बचाव होण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आणि त्यासोबत रेबीज प्रतिबंधक लस घेणे अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे लातूर शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही प्राण्यांनी चावा घेतल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करू नये, अशावेळी झालेली जखम भरपूर प्रमाणामध्ये साबणाचा वापर करून नळाखालील वाहत्या पाण्याचा वापर करून स्वच्छ धुवावी आणि आरोग्य विभागाअंतर्गत कार्यरत असणा-या जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाऊन वैद्यकीय अधिका-यांच्या सल्ल्यानुसार रेबीज प्रतिबंधात्मक लस घ्यावी. तरी लातूर शहर महानगरपालिका अंतर्गत वरील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रेबीज प्रतिबंधक लस विनामूल्य उपलब्ध असून गरजू रुग्णानी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आव्हान मनपा प्रशासनाने केले आहे.