अमरावती : प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या मागणीमुळे समाजात मराठा आणि ओबीसी असे दोन गट पडले आहेत, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आरक्षणाच्या निमित्ताने राजकीय भांडण समाजात आणण्याचा काहींचा डाव होता. पण आम्ही तो उद्ध्वस्त केला, असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
अमरावती येथे मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले आहे. आम्ही आरक्षण बचाव यात्रेची सुरुवात केली. या यात्रेला मोठे यश मिळाले आहे. छगन भुजबळ यांनी मराठवाड्यात १९७७ ला नामांतराची जी परिस्थिती होती तशीच परिस्थिती आता असल्याचे विधान केले होते. तर शरद पवार यांनी महाराष्ट्राचा मणिपूर होईल, असे विधान केले होते.
आज खात्रीलायक आणि शाश्वतीने मी हे विधान करू शकतो की, जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीमुळे समाजात दोन गट पडले आहेत. मराठा समाजाचा एक गट आणि दुसरा ओबीसींचा गट पडला आहे. राजकीय भांडण सामाजिक भांडणात आणण्याचे अनेकांचे मनसुबे आमच्या यात्रेतून उद्ध्वस्त झाले आहेत. आरक्षण आणि त्याची अंमलबजावणी तसेच त्याबाबतचा शेवटचा निर्णय कुणाचा याची माहिती आम्ही यात्रेतून देत आलो आहोत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.