अहिल्यानगर : प्रतिनिधी
मराठा आरक्षण आणि समाजाच्या प्रलंबित मागण्यांवरून मराठा आंदोलक पुन्हा आक्रमक झाले आहेत. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी आज मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यावर ठिय्या आंदोलन केले.
काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आंदोलन आणि उपोषणाचा मार्ग निवडला होता. त्यावेळी सरकारच्या वतीने विविध आश्वासने देण्यात आली होती. मात्र, त्या आश्वासनांची पूर्तता अद्याप झालेली नसून सरकारकडून केवळ वेळकाढूपणा सुरू असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
समाजाला दिलेली आश्वासने तातडीने पूर्ण करावीत याच पार्श्वभूमीवर रमेश केरे पाटील यांच्यासह मराठा आंदोलकांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन छेडले. आंदोलकांनी विखे पाटील यांना मागण्यांचे निवेदन देत सरकारची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. मराठा समाजाला दिलेली आश्वासने तातडीने पूर्ण करावीत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
आंदोलकांच्या मते, मराठा उपसमितीच्या माध्यमातून समाजाच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्याबाबत ठोस कार्यवाही दिसून येत नसल्याने समाजात नाराजी वाढत आहे. त्यामुळेच सरकारला जाब विचारण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले.
















