बीड : राज्यात सध्या नगर परिषदा व नगरपंतायतीच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पर्यावरण मंत्री तथा भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी आज वेगवेगळ्या मतदान केंद्रांना भेट देऊन मतदान प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांना सूचना केली की ‘मी व धनंजय मुंडे राजकारणी आहोत, आमच्या कामाबाबत गंभीर आहोत, असे असताना तुम्ही आम्हाला सतत बहीण-भाऊ म्हणू नका.’
पंकजा मुंडे यांनी नगर परिषदा व नगरपंचायत निवडणुकीसाठी बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी भाजपा उमेदवारांचा प्रचार केला. तर, त्यांचे बंधू तथा आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते धनंजय मुंडे हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसले. या निवडणुकीत बीडमध्ये अनेक ठिकाणी भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने युती केली आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे म्हणाल्या, असंख्य ठिकाणी आमची युती झाली आहे.
ही युती सर्व ठिकाणी विजयी होईल. पंकजा मुंडे यांना विचारण्यात आले की तुम्हा बहीण-भावाचं पॅनेल या निवडणुकीत उतरलं आहे. त्याबद्दल काय सांगाल? यावर त्या म्हणाल्या, ‘‘तुम्ही (प्रसारमाध्यमं) आम्हाला बहीण-भाऊ म्हणणं बंद करा. आम्ही बहीण-भाऊ आहोत. मात्र, त्याआधी आम्ही गंभीर राजकारणी आहोत. धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) नेते आहेत, तर मी भारतीय जनता पार्टीत आहे. आमच्या पक्षाची युती झाली आहे. असंख्य ठिकाणी आम्ही युती केली आहे.’’

