लातूर : प्रतिनिधी
लातूर शहराला पाणीपुरवठा होणा-या केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही मान्सूनचा दमदार पाऊस पडला नाही. त्यातच धरणातून काही दिवसांपुर्वी सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पाणीसाठ्यावर याचा परिणाम झाला आहे. सध्या या धरणातील उपयुक्त पाणीसाठा ४३.३२ दशलक्षघन मीटरवर आला आहे. जीवंत पाणीसाठा ४३.४२१ दशलक्षघन मीटरवर आहे. पावसाळ्याचा जुन संपला, जुलैही संपत आला आहे. त्यामुळे धरणातील पाणी जपून वापरण्याची आवश्यकता सध्या तरी आहे.
मांजरा धरणावर लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील सुमारे २१ विविध पाणीपुरवठा योजना अवलंबुन आहेत. त्यामुळे मांजरा धरणातील पाणीसाठा या तीन्ही जिल्ह्यांसाठी महत्वपूर्ण आहे. यावर्षी मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने धरण शंभर टक्के भरले होते. त्यातच दोन महिन्यांपुर्वी म्हणजेच मे महिन्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बेमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. परिणामी मांजरा धरणात मुबलक उपयुक्त पाणीसाठा राहिला. परंतु, पावसाळ्याचे जवळपास दोन महिने संपत आले तरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दरमदार पाऊस पडला नाही. परिणामी धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली नाही. पावसाळा असूनही पाऊस पडत नाही. त्यातच कडक उन्ह, पाण्याचा वाढता वापर यामुळे धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. धरणात आहे तो पाणीसाठा काटकसरीने वापरणे आवश्यक आहे. लातूर शहरात पाणी वाया घालण्याचे प्रमाण अधिक आहे.
गाव भागात अनेक नळांना तोट्या नाहीत. त्यामुळे पाणी भरुन झाल्यानंतर ते नालीत सोडले जाते. सुमारे ३३ टक्के पिण्याचे शुद्ध पाणी वाया जात आहे. याकडे लातूर शहर महानगरपालिकेने लक्ष देणे आवश्यक आहे. लातूर जिल्ह्यातील मांजरा, निम्न तेरणा हे दोन मोठे, लातूर तालुक्यातील तावरजा, रेणापूर तालुक्यातील रेणापुर व व्हटी, उदगीर तालुक्यातील तिरु, देवर्जन, शिरुर अनंतपाळ तालुक्यातील सकोळ, घरणी आणि निलंगा तालुक्यातील मसलगा हे आठ मध्यम प्रकल्प व १३४ लघू प्रकल्प, असे एकुण १४४ प्रकल्पांतील पाणीसाठ्याची स्थिती आजतरी समाधानकारक नाही.
दोन मोठ्या प्रकल्पांपैकी एका प्रकल्पात ५१ ते ७५ टक्के तर दूस-या प्रकल्पात २५ ते ५० टक्के पाणीसाठा आहे. आठ मध्यम प्रकल्पांपैकह एका प्रकल्पात २५ ते ५० टक्के, ५ प्रकल्पांत २५ टक्क्याच्या खाली, २ प्रकल्प जोत्याखाली आहेत. १३४ लघू प्रकल्पांपैकी २ प्रकल्प १०० टक्के भरलेले, ४ प्रकल्पांत ७५ टक्केपेक्षा जास्त पाणीसाठा, ११ प्रकल्पांत ५१ ते ७५ टक्के, २१ प्रकल्पांत २५ ते ५० टक्के, ७३ प्रकल्पांत २५ टक्के पाणीसाठा आहे. तर २३ लघु प्रकल्प जोत्याखाली आहेत.