पुणे : प्रतिनिधी
माझ्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले, मात्र मी कोणाचा पाच पैशांचा मिंधा नाही. समोर बसलेल्या लोकांनी सांगावं की कुठलंही काम करण्यासाठी अजित पवारांनी कधी पैसे घेतले का? असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. पुण्यातील एका प्रचारसभेत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले, सत्तेत असल्यास आपल्या मतदारसंघाचा, भागाचा, जिल्ह्याचा विकास करता येतो.
अजित पवार म्हणाले, माझ्यावर भ्रष्टाचाराचे, ७० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप केले गेले. मात्र, मी कोणाचा पाच पैशांचा मिंधा नाही. आज इथे दिलीप मोहिते पाटील बसले आहेत, कैलास, किरण, अरुण आणि आपले इतर अनेक सहकारी बसले आहेत. लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. इतक्या वर्षांपासून मी राजकारणात आहे, सामाजिक जीवनात काम करतो.
इथल्या एका माणसाने उठून सांगावे की अजित पवारांनी एखादे काम करत असताना कायतरी चिरीमीरी घेतली किंवा एखाद्या कामासाठी चिरीमिरी द्यावी लागली आणि मग आमचं काम झाले. उलट माझ्या कामाच्या बाबतीत सगळे अधिकारी टरकून राहतात. त्यांना भिती असते की याला समजले तर काही खरं नाही.
तत्पूर्वी अजित पवार यांनी माळेगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भाजपा पुरस्कृत जनमत विकास आघाडीच्या वतीनं आयोजित माळेगावमधील प्रचाराच्या सांगता सभेत उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी माळेगावच्या विकासासाठी या निवडणुकीत उभ्या केलेल्या आमच्या सर्व उमेदवारांना माळेगावकरांचं पाठबळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

